दिग्रस : पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघात 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली असून सर्वाधिक म्हणजे 66 टक्के मतदान झाले होते. यानंतर आज, शनिवारी (23 नोव्हेंबर) सर्व मतदारासंघाचे निकाल समोर येत असून महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील दिग्रस विधानसभेत महायुतीकडून विद्यमान पालकमंत्री आणि शिवसेनेचे संजय राठोड हे विजयी झाले आहेत. (Shiv Sena Sanjay Rathod wins from Digraj constituency in the assembly elections)
आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर राज्यभरातील नागरिकांचे लक्ष यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील दिग्रस विधानसभेवर लागले होते. कारण याठिकाणी काँग्रेसकडून महाविकास आघाडीचे माजी मंत्री माणिकराव ठाकरे आणि शिवसेनेचे संजय राठोड हे निवडणुकीच्या रिंगणात होते. खरं तर तब्बल 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच आजी-माजी मंत्र्यांमध्ये या मतदारसंघामध्ये थेट सामना होत होता.
हेही वाचा- Maharashtra Election Result 2024 : नावात साधर्म्य असल्याने मविआला फटका; शेळकेंचा 1500 मतांनी पराभव
दिग्रस विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर काँग्रेसला याठिकाणी चांगले यश मिळाले आहे. 1952 पासून आतापर्यंत झालेल्या 15 निवडणुकांमध्ये काँग्रेसने 8 वेळा विजय मिळवला आहे, तर शिवसेनेला 4 वेळा विजय मिळवता आला. विशेषतः मागील तीन निवडणुकांमध्ये शिवसेनेचा दबदबा राहिला आहे. मात्र, शिवसेनेतील फूट आणि महाविकास आघाडीच्या एकत्रित लढाईमुळे काँग्रेसला यंदा विजयाची संधी होती.
या मतदारसंघाबद्दल बोलायचे झाले तर या ठिकाणी विविध समाजघटकाचे एकूण 3.45 लाख राहतात. यामध्ये बंजारा 85 हजार, ओबीसी 65 हजार, कुणबी-मराठा 65 हजार, मुस्लिम 35 हजार आणि अनुसूचित जाती-जमातीचे 50 हजार असे विभाजन झाले आहे. दिग्रस परिसरात रोजगाराची कमतरता ही प्रमुख समस्या आहे. याशिवाय दारव्हा पाणीपुरवठा प्रकल्पाचा रखडलेला प्रश्न आणि अपूर्ण रस्ते प्रकल्प हेही प्रश्न आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून या मुद्द्यांवर फारसा प्रगती झालेली नाही. त्यामुळे हे दिग्रजमधील स्थानिक विकासाचे मुद्दे या निवडणुकीत महत्त्वाचे ठरले. याचपार्श्वभूमीवर तेथील मतदारांनी संजय राठोड यांना 28775 मतांनी मोठा विजय मिळवून दिला. संजय राठोड यांना 143115 मते मिळाली, तर मानिकराव ठाकरे यांना 114340 मते मिळाल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा – Maharashtra Election Result 2024 : सुलभा खोडके पडल्या काँग्रेस उमेदवारावर भारी; 5 हजार मतांनी केला पराभव