संजय राऊतांना ईडीकडून तूर्तास दिलासा, कागदपत्र सादर करण्यासाठी 14 दिवसांची मुदतवाढ

मुंबईतील गोरेगाव येथील पत्रा चाळ पुनर्विकासात १ हजार ३४ कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीने काही दिवसांपूर्वी अटक केली होती

shiv sena ownership dispute Sanjay Raut given list of evidence shiv sena ownership

राज्यात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 41 बंडखोर आमदारांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे, तर दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणांकडून राजकीय नेत्यांच्या चौकशींचे सत्र सुरु आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाही गोरेगाव पत्रा चाळ मनी लाँड्रिंगप्रकरणी मंगळवारी म्हणजे आज चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आला होता. मात्र संजय राऊत आज चौकशीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत. संजय राऊत यांनी ईडीकडे चौकशीसाठी हजर राहण्यासाठी 14 दिवसांची मुदत वाढ मागितली होती, ही मुदतवाढ ईडीने मान्य केली आहे. कागदपत्र सादर करण्यासाठी राऊतांनी ही मुदतवाढ मागितली आहे.

संजय राऊत यांचे वकील अँड. विकास हे थोड्यावेळापूर्वी ईडी कार्यालयात पोहचले होते. यावेळी राऊतांच्या वकीलांनी ईडीला सांगितले की, संजय राऊत अलिबागच्या पूर्वनियोजित दौऱ्यावर असल्यामुळे ईडीने मागितलेली कागदपत्र तातडीने जमा करुन देणं शक्य नाही, त्यामुळे १४ दिवसांची मुदत वाढ देण्याचा मागणीचा अर्ज त्यांनी ईडीला दिला होता. तो अर्ज आता ईडीने स्वीकारला आहे. त्यामुळे संजय राऊतांना 14 दिवस तरी ईडी चौकशीपासून दिलासा मिळत आहे.

संजय राऊत यांच्याविरोधात मुंबईतील पत्रा चाळ जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचे आरोप आहेत. या आर्थिक गैरव्यवहारात त्यांची पत्नी आणि मित्रांचे देखील नाव समोर आले होते. दरम्यान शिवसेनेच्या काही बंडखोर आमदारांमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात असताना राऊत यांना ईडीच्या चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.

काय आहे पत्राचाळ प्रकरण?

मुंबईतील गोरेगाव येथील पत्रा चाळ पुनर्विकासात १ हजार ३४ कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीने काही दिवसांपूर्वी अटक केली होती. या खटल्यात ईडीने गेल्याच आठवड्यात आरोपपत्र दाखल केले आहे. या घोटाळ्यातून मिळालेल्या पैशातून संजय राऊत यांनी पत्नी वर्षा राऊत आणि सुजीत पाटकर यांची पत्नी स्वप्ना पाटकर यांच्या नावाने अलिबागमध्ये भूखंड खरेदी केल्याचे ईडीचे म्हणणे आहे. या भूखंडांची किंमत अंदाजे ६० लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. स्थानिकांना धमकावून हे भूखंड कमी पैशात खरेदी केल्याचाही ईडीचा आरोप आहे. अलिबागमधील हे 8 भूखंड आणि दादरमध्ये वर्षा राऊत यांच्या नावावर असलेल्या राहत्या सदनिकेवर ईडीने टाच आणली आहे.

राऊतांच्या मुलींच्या कंपनीत भागीदार असलेल्या सुजीत पाटकर यांच्या घरावरही यापूर्वी ईडीने छापेमारी केली होती. शिवाय संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली होती. या प्रकरणी त्यांची चौकशीही झाली होती.


त्यांनी संपर्कात असलेल्या आमदारांची नावे जाहीर करावीत, एकनाथ शिंदेंचं शिवसेनेला आव्हान