…तर ‘त्या’ भाजप नेत्यांनी आदित्य ठाकरेंची माफी मागावी; राऊतांची मागणी

shiv sena sanjay raut reaction cbi report Disha Salian Death Case and aditya thackeray bihar visit

आदित्य ठाकरेंवर त्यावेळी ज्यांनी ज्यांनी आरोप केले यात भाजपचे नेते आणि महिला नेत्या होत्या, त्यांनी ताबडतोब आदित्य ठाकरेंची माफी मागायला हवी. आरोप केलात मग माफी मागा. सीबाआय म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणेचा असा अहवाल आला आहे तर तेव्हा तुम्ही तोंडाची थुंकी कशाला उडवत होता आणि तरूण नेत्याला का बदनाम करत होता. आता माफी मागा, अशी संतप्त मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयने दिलेल्या ताज्या अहवालावर राऊत यांनी आज माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली आहे.

आता परत महाराष्ट्रात राजकीय परिवर्तन करण्याच्या तयारी

यावेळी राऊतांनी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राऊत म्हणाले की, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याकडे बिहार दौरा म्हणून बघू नका. आदित्य ठाकरे शिवसेनेचे प्रमुख तरुण युवा नेते आहेत.
या बिहार दौरा म्हणून न बघता त्याला राष्ट्रीय दौरा म्हणून महत्त्व दिले पाहिजे. या देशातील प्रमुख तरुण नेते आहेत त्यांच्या नेतृत्त्वाखाली अनेक राज्ये, अनेक भाग काम करत आहे. तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या मदतीने राजकीय परिवर्तन केलं आहे. महाराष्ट्रात आम्ही अडीच वर्षापूर्वी केलं होतं, आता परत महाराष्ट्रात राजकीय परिवर्तन करण्याच्या तयारीत आहोत. असं संजय राऊत म्हणाले.

याकडे राजकीय रणनीती म्हणून पाहावं

अशा तरुण नेत्यांना भेटून एक मजबूत पर्यायी फळी या देशामध्ये उभारण्यासाठी आदित्य ठाकरे जोरदार प्रयत्न करत आहे, आणि त्यांना यश मिळेल ही खात्री आहे. देशातील अनेक तरुण नेत्यांना आदित्य ठाकरेंसोबत संवाद साधायला आहे आणि तो संवाद साधण्यास सुरुवात झाली आहे. अखिलेश यादव, अभिषेक बॅनर्जी यांना आदित्य ठाकरेंशी संवाद साधून देशात पर्याय द्यायचा आहे. याकडे हे राज्य म्हणून न पाहता राजकीय रणनीती म्हणून पाहावं,असं ते म्हणाले.

काल रावसाहेब दानवेंनी सांगितलं आहे, दोन महिन्यात काय होईल सांगता येत नाही. याचा अर्थ त्यांना आमच्या हालचालीची बित्तंबबातमी कळलेली दिसते. भूगर्भात ज्या हालचाली सुरू आहेत, पडद्यामागे काही हालचाली सुरू आहेत, केंद्रीय मंत्री असल्याने त्यांच्या कानापर्यंत काही गोष्टी गेल्या असतील, असं सूचक विधानही राऊतांनी केलं आहे.


…तर केंद्रासह त्यांचे राज्यांतील हस्तक महाराष्ट्राचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही; राऊत बरसले