घरमहाराष्ट्रतुमचे कर्तृत्व काय याचा विचार करा; संजय राऊतांचा बावनकुळेंना टोला

तुमचे कर्तृत्व काय याचा विचार करा; संजय राऊतांचा बावनकुळेंना टोला

Subscribe

मुंबई :  टीका करणाऱ्यांनी आपले कर्तृत्व काय याचा आधी विचार करावा, अशा शब्दांत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्राशेखर बावनकुळे यांना टोला लगावला. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर जादुटोणा केला अशा आशयाचे वक्तव्य बावनकुळे यांनी केले होते. त्याबाबत प्रसार माध्यमांनी विचारले असता राऊत यांनी हा टोला लगावला. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून स्वतःकडे लक्ष वेधून घेणे हे आता भाजपच्या नेत्यांचे काम बनले आहे. याचा अर्थ ते स्वतःच्या कामावर उभे नाहीत. त्यांना आमच्यावर चिखलफेक करून प्रसिद्धी मिळवायची असेल, तर त्यांनी हे थांबवायला हवे, असे राऊत म्हणाले.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे देशाचे प्रमुख नेते आहेत. त्यामुळे अशी चिखलफेक करणाऱ्यांनी याचे भान ठेवावे. शरद पवार, उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्यांनी आपले कर्तृत्व काय आहे याचा विचार करावा,असा सल्ला संजय राऊत यांनी दिला.

- Advertisement -

हातात अमर्याद सत्ता आहे म्हणून ते आमच्या नेतृत्वावर अशी विधाने करत आहेत. वास्तविक त्यांनी काय विधान केले याची मला माहिती नाही. मात्र, अशी विधाने कोणीही करू नये. आम्ही करत नाही, तुम्हीही करू नये. तुम्ही अशी विधाने केली, तर मग आम्ही आहोतच, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एका कार्यक्रमात एकत्र येणार असल्याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, आंबेडकर आणि ठाकरे या दोन शक्ती एकत्र येतील तर राज्याचे नाही तर देशाचे चित्र बदलेल. प्रबोधनकार ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बोलावले तेव्हा बाबासाहेब आंबेडकरही त्यांच्या हाकेला ओ देऊन ते या चळवळीत सहभागी झाले. बाबासाहेब आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे हे आजोबांचे नाते होते आणि आता ते नातवापर्यंत पोहोचलेले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -