घरमहाराष्ट्रराज्यात सत्तासंघर्ष आणखी तीव्र, बंडखोर आमदारांवरील कारवाईला शिवसेनेकडून वेग

राज्यात सत्तासंघर्ष आणखी तीव्र, बंडखोर आमदारांवरील कारवाईला शिवसेनेकडून वेग

Subscribe

गेल्या चार दिवसांपासून शिवसेनेत निर्माण झालेली बंडाळी संपुष्टात येण्याची शक्यता पूर्णपणे मावळल्याने राज्यात सत्तासंघर्ष तीव्र झाला आहे. राज्यातील आघाडीचे सरकार वाचविण्यासाठी शिवसेनेने बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याची कारवाई सुरु केल्यानंतर शिंदे गटाकडून या कारवाईला आव्हान देण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. ४८ तासांपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असलेल्या उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ मिळाल्यानंतर सरकार तसेच पक्ष वाचविण्यासाठी आक्रमक झाले आहेत. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी दिवसभर विविध नेत्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी संध्यकाळी उशीरा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. सरकार वाचविण्यासाठी आघाडीने प्रयत्नांची शर्थ चालवली असताना मुंबईतील आमदार दिलीप लांडे यांनी आज गुवाहाटीत दाखल होत शिंदे गटाचा झेंडा हातात घेतला. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांची संख्या आणखी वाढली आहे. राज्यात वेगाने राजकीय घडामोडी होत असतना भाजप अजून मौन पाळून आहे.

२० जून रोजी विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरु असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. या बंडात शिवसेनेचे ३८ आमदार सहभागी झाल्याने शिवसेनेसह आघाडीचे सरकार संकटात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज बंडाच्या चौथ्या दिवशी शिवसेनेने बचावात्मक पवित्रा सोडून आक्रमक भूमिका घेतली. काल, गुरुवारी शिवसेनेच्या १२ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर शिवसेनेने आज आणखी चार बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यासाठी विधासभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र दिले. या पत्रात शिंदे गटातील चिमणराव पाटील,संजय रायमुलकर, बालाजी कल्याणकर आणि प्रा. रमेश बोरनाळे यांच्या नावाचा समावेश आहे. बंडखोरांवरील कारवाईबाबत शिवसेना नेते सुभाष देसाई आणि खासदार अरविंद सावंत यांनी झिरवळ यांची भेट घेऊन चर्चा केली.

- Advertisement -

शिवसेनेकडून अपात्रतेच्या कारवाईचा बडगा उचलला जात असल्याचे पाहून एकनाथ शिंदे गटातील अपक्ष आमदार महेश बालदी आणि विनोद अग्रवाल यांनी विधान मंडळाला पत्र पाठवून विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्यामुळे शिंदेंच्या बंडात नव्या नाट्याची भर पडली असून सत्तासंघर्षाला दोन्ही बाजूने धार चढली आहे. एकनाथ शिंदे गटाला निष्प्रभ करण्यासाठी शिवसेनेकडून सर्व कायदेशीर आणि वैध मार्गाचा अवलंब केला जात आहे. सत्ता संघर्ष न्यायालयात जाणार असल्याने त्यादृष्टीने शिवसेनेकडून सर्व तयारी सुरु आहे. शिवसेनेच्या डावपेचांना कायद्याच्या भाषेतच उत्तर देण्यची तयारी शिंदे गटाने ठेवली असून त्यादृष्टीने निष्णात वकिलांची फौज उभी केली आहे. मुंबईत घडणाऱ्या सर्व घडामोडींवर शिंदे गट लक्ष ठेवून आहे.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाठीशी राहण्याची ग्वाही दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा आत्मविश्वास दुणावला असून त्यांनी बंडखोर गटाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आज शिवसेना भवनात राज्यभरातील जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांना मार्गदर्शन करताना ठाकरे यांच्या चेहऱ्यावर आश्वासक भाव होते. शरद पवार यांनी आजही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बसून राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळ्से पाटील यांच्याशी चर्चा करून शिंदे यांच्या गटातील घडामोडींची माहिती घेतली. त्यानंतर पवार यांनी संध्याकाळी उशीरा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी पुढील रणनीतीवर चर्चा केली.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -