महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सर्वोच्च न्यायालयात आज सलग दुसरा दिवस

विधानसभा अध्यक्ष पद रिकामे होते. विधानपरिषद सदस्यांची निवड यादी देऊनही झाली नाही. असे प्रकार होत असतील तर लोकशाही कशी टीकणार याकडेही ज्येष्ठ वकील सिब्बल यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. बुधवारी ज्येष्ठ वकील सिब्बल पुन्हा ठाकरे गटाकडून युक्तिवाद करणार आहेत.

नवी दिल्लीः महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा सर्वोच्च न्यायालयात आज दुसरा दिवस आहे. या सुनावणीत ठाकरे गटाकडून युक्तिवाद सुरु आहे. विधनासभा अध्यक्षांना आमदारांना अपात्र करण्याचे अधिकार आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने मंगळवारी नोंदवले. ठाकरे गटाने लवकरात लवकर युक्तिवाद पूर्ण करावा, अशी सुचनाही न्यायालयाने केली आहे. त्यानुसार आज ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी सुरु आहे. मंगळवारी ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद सुरु केला. शिवसेनेतून एक गट बाहेर पडला. गुवाहाटीला गेला. तेथून त्यांनी विधानसभा अध्यक्षांविरोधात अपात्रतेची नोटीस पाठवली. ही नोटीस पक्षाच्या अधिकृत ईमेलवरुन पाठवलेली नाही. ही नोटीस विधान सभेबाहेर देण्यात आली आहे. विधानसभेत ही नोटीस देण्यात आलेली नाही. त्या नोटीसवर विधानसभा अध्यक्ष अपात्र कसे ठरू शकतात, असा सवाल ज्येष्ठ वकील सिब्बल यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केला. विधानसभा अध्यक्ष हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे ते अपात्रतेची कारवाई करु शकतात. ही कारवाई न्यायालय करु शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

शिवसेनेतला एक गट आसामला जातो आणि सांगतो आता आम्हीच खरा पक्ष आहोत. शिवसेनेने काढलेला व्हीप डावलून त्यांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात एकही बैठक झाली नव्हती. ही बैठक नवीन सरकार स्थापनेनंतर १९ जुलै २०२२ रोजी झाली, असे ज्येष्ठ वकील सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संख्याबळ न बघताच पहाटे देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा शपथविधी उरकला. कोणत्या अधिकाराखाली हा शपथविधी झाला. विधानसभा अध्यक्षांची निवड झाली नाही. आधी निवड होऊन मग राजीनामा घेणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. विधानसभा अध्यक्ष पद रिकामे होते. विधानपरिषद सदस्यांची निवड यादी देऊनही झाली नाही. असे प्रकार होत असतील तर लोकशाही कशी टीकणार याकडेही ज्येष्ठ वकील सिब्बल यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. बुधवारी ज्येष्ठ वकील सिब्बल पुन्हा ठाकरे गटाकडून युक्तिवाद करणार आहेत.