शिंदे गटात गेल्याने शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रेंची हकालपट्टी, सेनेला फटका

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुंबईतील काही आमदार सहभागी झाले आहेत. परंतु आमदारांनंतर आता काही खासदार देखील शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या आमदारांची, खासदारांची हकालपट्टी करताना दिसत आहेत. अशातच शिवसेनेच्या विभाग क्रमांक १ च्या माजी नगरसेविका आणि पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि महिला उपविभाग संघटक गौरी खानविलकर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत उद्धव ठाकरेंनी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आदेश दिले आहेत.

शीतल म्हात्रे यांनी काल मंगळवारी काही कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदेची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांना साथ देत एकनाथ शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

आम्ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसोबत उभे आहोत. आम्ही रस्त्यावर उभे राहणारे शिवसैनिक आहोत.शिवसेनेचा भगवा मुंबई महापालिकेवर कायम राहणार आहे. आज गुवाहाटीत बसले आहेत, परंतु शिवसेनेला शून्यातून उभं करण्याची सवय आहे, असा टोला म्हात्रे यांनी शिंदे गटाला लगावला होता. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलं होत. मात्र, त्यांनीही आता शिंदे गटाला पाठिंबा दिला असून शिंदेंची भेट घेतली आहे.

शीतल म्हात्रे यांच्यावर गंभीर गुन्हे असल्याचं समोर आलं आहे. शीतल म्हात्रे यांनी कायदेशीर कारवाई होऊ नये म्हणून शिंदेंच्या गटाला समर्थन दिलं का? असा सवाल उपस्थितीत केला जातोय. एका २२ वर्षीय मुलाला मारहाण केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ८ जुलैला एफआयआर दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र त्यानंतर त्यांनी शिंदे गटाला समर्थन देत प्रवेश केला आहे.

मनसेची टीका

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर २९ जूनला फेसबुक लाईव्ह करत उद्धव ठाकरेंनी भावनिक भाषण केले आणि मुख्यमंत्रिपदासह विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यावर शीतल म्हात्रे यांनी उद्धव साहेब जिंकलात असं ट्विट केलं होतं. मनसेचे गजानन काळे यांनी या ट्विट वरूनच म्हात्रेंना टोला लगावला आहे. म्हात्रेंचें हे ट्विट आणि कालचा त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत ‘खरचं..’ अशी उपहासात्मक टीका केली आहे.


हेही वाचा : राष्ट्रपती निवडणूक : शिवसेनेची भूमिका अनाकलनीय असल्याचे काँग्रेसचे मत