निषेध ठराव मांडा, कोश्यारींना हटवा; सुषमा अंधारेंची उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी

sushma andhare

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपमानस्पद वक्तव्याप्रकरणी आज सर्व पक्षांनी पुणे बंदची हाक दिली आहे. यात राज्यपाल कोश्यारींनी केलेल्या विधानाचाही जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे. या बंदात भाजप, मनसे वगळता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक शिवप्रेमी संघटना सहभागी झाल्या आहेत. मात्र भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवरायांबद्दल वेगळी भूमिका घेत बंदला पाठींबा दिला आहे. उदयनराजे स्वत: या बंदात सहभागी झाले आहेत. दरम्यान शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांविरोधातील अपनास्पद वक्तव्याप्रकरणी पुणे बंदमध्ये सहभागी होत राज्यापाल भगतसिंग कोश्यारींना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. तसेच शिंदे फडणवीस सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे. सुषमा अंधारे आज पुण्यात एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बाळगलेले मौन सुनियोजित षडयंत्राचा भाग वाटत आहे. देवेंद्रजींना खरचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपुलकी, आदर असेल तर त्यांनी निषेध ठराव मांडत राज्यपाल कोश्यारींना हटवण्यासाठी पत्र लिहावे, अशी मागणी केली आहे.

भाजप खासदार उदयराजे भोसलेंच्या पुणे बंदच्या पाठींब्याबद्दल बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, इथे भाजपचा खासदार म्हणून कोणी आलेला नाही. इथे कोणी पक्षाचा माणूस म्हणून आलं नाही, इथे पक्ष म्हणून नाही तर शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून जमा झालो आहोत, छत्रपतींविषयी आदर प्रेम व्यक्त करण्यासाठी आले आहोत.

निषेध ठराव मांडा, कोश्यारींना हटवा आणि महापुरुषांचा कोणी अवमान करणार नाही यासंदर्भात एक कडक कायदा करा, अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे.

आम्ही शांततेत मोर्चा काढणारे लोकं आहोत. आम्ही भाजपसारखे मस्तवाल, बोताल आणि संसदीय चौकट मोडणारे लोकं नाही, आम्ही कायदा पाळणारे लोकं आहोत. आम्ही संविधानीक मार्गाने आमचा राग व्यक्त करत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेलं वक्तव्य जाणीवपूर्वक आहे. इथे ठरवून दैनंदिन प्रश्नांपासून लक्ष हटवण्यासाठी अशी वक्तव्य केली जातात, असा आरोपही सुषमा अंधारेंनी केला आहे.

पुण्यातील डेक्कन ते लाल महालपर्यंत हा मोर्चा असणार आहे. पुण्यातील व्यापारी संघटना आणि विविध संघटनांनीही या बंदला पाठींबा दिला आहे. त्यामुळे पुण्यातील मार्केट यार्ड परिसरासह अनेक ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दरम्यान पुण्यातील पीएमपीएल बस सेवा, भाजीपाला, फुल मार्केट बंद आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


भारत-चीन सीमावादावर राजकारण बंद करा; अमित शाह काँग्रेसवर भडकले