मुंबई – महायुतीला विधानसभा निवडणुकीत 230 हून अधिक जागा मिळाल्या आहेत. एवढे विक्रमी बहुमत असूनही महायुतीचे सरकार स्थापन होण्यास मुहूर्त लागत नाही, यावरुन विरोधक आता डिवचायला लागले आहेत. महायुतीचे सरकार केव्हा स्थापन होणार, तोपर्यंत राज्य कोणाच्या भरवशावर ठेवले असा खोचक सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच लाडकी बहीण योजना आणणाऱ्या महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी एकही लायक बहीण नाही का, असा सवाल अंधारेंनी विचारला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, भाजप आणि महायुतीने लाडक्या बहीणांचा एवढा गवगवा केला. मात्र आता सत्ता आल्यानंतर लाडक्या बहिणींना सत्तेचा वाटा मिळणार आहे का? असा सवाल करत अंधारे म्हणाल्या की, लडकी बहीण 1500 रुपयांमध्ये खूश आणि अख्खी तिजोरी लाडक्या भावाच्या हातात, हे किती दिवस चालणार आहे. भारतीय जनता पक्षात एकही लाडकी बहीण नाही का? मुख्यमंत्रीपदासाठी लाडक्या बहीणीचा विचार होणार नाही का, असा प्रश्नांचा भडीमार अंधारेंनी महायुतीच्या नेत्यांवर केला.
महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी होणार असेल तर तोपर्यंत देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य कोणाच्या भरवशावर ठेवणार, असाही सवाल अंधारेंनी केला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. ते आता काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. त्यात मुख्यमंत्रीपद आणि खाते वाटपावरुन नाराज होऊन ते त्यांच्या मुळ गावी निघून गेले आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या राज्याचा कारभार कोण चालवणार असा सवाल अंधारे यांनी केला.
यांना मंत्रिपद…
भारतीय जनता पक्षात पंकजा मुंडे या मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेतील महिला नेत्या आहेत. तसेच आता स्थापन होणाऱ्या सरकामध्ये भाजपच्या तीन ते चार महिला नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. यामध्ये चिखलीच्या श्वेता महाले, देवयानी फरांदे यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी चर्चा आहे.
हेही वाचा : Waqf board : वक्फला 10 कोटी अनुदानाचा जीआर 24 तासात मागे; फडणवीसांचे ट्विट चर्चेत, पडद्यामागे काय घडतंय!
Edited by – Unmesh Khandale