मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. 132 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष बनला तर महायुतीला 230 जागांवर विजय मिळाला आहे. मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय उद्या दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेत्यांसोबतच्या बैठकीत होणार आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन भाजपचे केंद्रीय नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे सांगून भाजप नेत्यांची मोठी चिंता दूर केली आहे. मात्र महायुतीला मिळालेल्या बहुमतावर विरोधकांनी शंका उपस्थित केली आहे. कोणतीही लाट नसताना एवढं विक्रमी बहुमत मिळण्याचे कारण हे ईव्हीएम असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. काँग्रेसने लवकरच ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने यापुढी निवडणूक बॅलेट पेपरवर घेतली नाही तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
निवडणुका मतपत्रिकेवर घ्या, नाही तर…
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेताही निवडता येणार नाही अशी स्थिती काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची झाली आहे. महाराष्ट्रात महायुतीच्या बाजूने कोणतीही लाट दिसत नव्हती असे असताना त्सुनामी प्रमाणे जागा कशा मिळाल्या याबद्दल विरोधकांकडून आता शंका उपस्थित केल्या जात आहे. महाविकास आघाडीने ईव्हीएमवरही शंका उपस्थित केली आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठं विधान केलं आहे. आगामी काळात महापालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुका मतपत्रिकेवर (बॅलेट पेपर) घेतल्या नाही तर आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, देशात हुकूमशाही सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या निर्णयाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. त्यावरुनही अंधारेंनी महायुतीला टोला लगावला. त्या म्हणाल्या, एकनाथ शिंदे यांचं दबावाचं राजकारण भाजपपुढे कामी आलेलं नाही. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना माघार घ्यावी लागली. पत्रकार परिषदेतील त्यांच्या वक्तव्यावर अंधारे यांनी खरपूस समाचार घेतला.
Edited by – Unmesh Khandale