घरमहाराष्ट्रshivsena.in वरील माहिती गायब; ट्विटर हॅंडल हॅक?

shivsena.in वरील माहिती गायब; ट्विटर हॅंडल हॅक?

Subscribe

मुंबईः शिवसेनेच्या महाराष्ट्र व मुंबई ट्विटर हॅंडल पेजवर असलेली shivsena.in या लिंकवरील माहिती गायब झाली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर माहिती उपलब्ध नसल्याचा मेसेज येतो. त्यामुळे शिवसेनेचे ट्विटर हॅंडल हॅक झाल्याची चर्चा आहे.

शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला दिले जात असल्याचा निकाल शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह लावले. शनिवारी माय महानगरने शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हॅंडलचा तपशील तपासला. त्यावेळी त्या पेजवरील shivsena.in या लिंकला क्लिक केल्यानंतर त्याची माहिती उपलब्ध नसल्याचा मेसेज आला. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ट्विटर हॅंडलवर त्यांच्या पक्षाची माहिती देणारी लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांची माहिती तत्काळ मिळत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या महाराष्ट्र व मुंबई ट्विटर हॅंडल पेजवरील लिंक हॅक झाल्याची चर्चा सुरु आहे.

- Advertisement -

शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर शिंदे गटाने शिवसेना शाखा, विधान भवन व पालिकेतील कार्यालयांवर दावा सांगण्यास सुरुवात केली. दापोली येथे तर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तेथील शिवसेनेच्या शाखेवर ताबा घेण्यासाठी धाव घेतली. तेव्हा तेथे ठाकरे व शिंदे गटामध्ये हाणामारी झाली. शनिवारी पुणे येथे ठाकरे व शिंदे गटाचे पदाधिकारी एकमेकांना भिडले.

ठाकरे व शिंदे गट संघर्ष सुरु झाला असतानाच सोशल मीडियावरही याचे युद्ध सुरु झाले. शिवसेनेच्या महाराष्ट्र व मुंबई ट्विटर हॅंडलवरून shivsena.in लिंकची माहितीच गायब झाल्याने सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. ही माहिती नेमकी कोणी गायब केली. ही तांत्रिक अडचण आहे की कोणी हेतूपूरस्सर ही माहिती गायब केली आहे याची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र शिंदे गटाला शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर ही माहिती गायब झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावरही ठाकरे व शिंदे गटाचा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -