मुंबई – राज्यात महायुतीला विक्रमी बहुमत मिळाले आहे. भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक 130 पेक्षा जास्त जागा मिळाल्या. महायुतीचा मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा आणि देवेंद्र फडणवीस होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. अशावेळेस शिवसेना ठाकरे गटाने आज मुंबईत अदानी, लोढा, गुंडेचा, झुंडेचा घुसले आणि त्यांनी मराठी माणसांची नाकाबंदी सुरु केल्याचा आरोप केला आहे. त्याचवेळी फडणवीस, तुम्ही कोणाच्या बाजूने उभे राहणार? असा रोखठोक सवाल शिवसेना ठाकरे गटाने केला आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मुंबईत मराठी माणसाची जी दयनीय अवस्था झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती आता पुन्हा होताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर समाजमाध्यमांवर टीका केल्याबद्दल फडणवीसांचे एक खासमखास ‘उपरे’ समर्थक इतके संतापले की, त्यांनी ‘गजाभाऊ’ या अज्ञात मराठी माणसाला ‘जगात जेथे असशील तेथून उचलून आणू’, अशी धमकीच दिली. उचलून आणऊ हे काय त्याची पूजा करणार? उचलून आणू व मारू, खतम करू, हात त्या धमकीचा गर्भित अर्थ आहे. मुंबईत या उपऱ्यांनी भाजपच्या पाठिंब्यावर कसा धुमाकूळ घातला आहे व मराठी जनतेला कसे धमकावत आहेत त्याचे हे उत्तम उदाहरण आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाने दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून केली आहे.
‘गजाभाऊ’ आता काय करणार?
मराठी माणसाला ‘गजाभाऊ’ संबोधत शिवसेना ठाकरे गटाने म्हटले आहे की, “आता मराठी माणसाला उचलून आणून मारण्याची भाषा सुरु झाली व अशा धमक्या देणारे लोक फडणवीसांच्या अंतस्थ गोटातले आहेत हे दुर्दैव! त्यामुळे मराठी माणसाला अधिक एकजुटीने आणि सावधानतेने राहावे लागेल. तसेच तितक्याच निर्भयपणे ‘हर हर महादेव’चा गजर करावा लागेल.” असा इशारा ठाकरे गटाने मराठी माणसाला दिला आहे.
फडणवीस, तुम्ही कोणाच्या बाजूने?
अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, “भाजपच्या पोटातील मराठी द्वेषाची मळमळ बाहेर पडली. आता त्यांच्याच हाती महाराष्ट्रराज्याची सूत्रे जात आहेत. म्हणून लढा थांबवता येणार नाही. गजाभाऊ, आता काय करणार?” असे म्हणत मराठी माणसाला शिवसेना ठाकरे गटाने साद घातली आहे. मरता मरता मरावे या मंत्रास जागून तो लढेल व महाराष्ट्राच्या दुश्मनांना मारेल. असे म्हणत शिवसेनेने भावी मुख्यमंत्री फडणवीस यांनाही सवाल केला आहे. शिवसेना ठाकरे गटाने म्हटले आहे की, फडणवीस, तुम्ही कोणाच्या बाजूने उभे राहणार? गजाभाऊ की तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचणाऱ्या उपऱ्या महाराष्ट्र दुश्मनांच्या बाजूने? एकदाचे काय ते सांगून टाका! असा सवाल शिवसेना ठाकरे गटाने देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीपूर्वी केला आहे.
हेही वाचा : Mahayuti Oath Ceremony : आझाद मैदानात फक्त तीन जणांचा शपथविधी, काय आहे कारण ?
Edited by – Unmesh Khandale