छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्राच्या राजकारणात नैतिकतेचा मुद्दा वेशीवर टांगला गेला आहे. राज्यातील राज्यकर्त्यांची नैतिकता संपली आहे. असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. “मुंबई सर्वात सुरक्षित शहर असून काहीवेळा एखादी घटना घडते,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. मात्र या राज्यातील राज्यकर्त्यांची नैतिकता संपली आहे, याचे द्योतक म्हणजे हे असंवेदनशील वक्तव्य आहे. असे म्हणत अंबादास दानवे यांनी सैफ अली खानवर घरात घुसून झालेला चाकू हल्ल्याच्या घटनेनंतर राज्यातील गु्न्हेगारीचा पाढाच वाचला. सरपंच संतोष देशमुख, विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी, माजी आमदार बाबा सिद्दीकींची हत्या, यासह राज्यातील गुन्हेगारीच्या एवढ्या घटना होऊनही राज्यकर्ते त्यांचे अपयश मानायला तयार नाही, उलट असंवेदनशील वक्तव्य करत असल्याचा टोला अंबादास दानवे यांनी लगावला.
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर ठाकरे गट संतप्त
अंबादास दानवे यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करुन राज्यात महायुती सरकारच्या काळात वाढलेल्या गुन्हेगारीचा पाढा वाचला आहे. अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसून चाकू हल्ला करण्यात आला. त्यावरुन मुंबई सामान्य माणसासाठी सुरक्षित आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असंवेदनशील वक्तव्य केले असल्याचा आरोप दानवेंनी केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईच्या सुरक्षेवर म्हटले की, “मुंबई सर्वात सुरक्षित शहर असून काहीवेळा एखादी घटना घडते.” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. मात्र या राज्यातील राज्यकर्त्यांची नैतिकता संपली आहे, याचे द्योतक त्यांचे हे असंवेदनशील वक्तव्य आहे, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते दानवे म्हणाले.
मुख्यमंत्री असंवेदनशील – अंबादास दानवे
मुंबई सर्वात सुरक्षित शहर असून काहीवेळा एखादी घटना घडते असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. मात्र या राज्यातील राज्यकर्त्यांची नैतिकता संपली आहे, याचे द्योतक म्हणजे हे असंवेदनशील वक्तव्य आहे.
असे असेल तर मग या राज्यात सुरक्षित आहे तरी कोण..? सैफ अली खान सुरक्षित नाही, पुण्यातील ऑफिसात जाणारी आमची बहीण सुरक्षित नाही, सरपंच संतोष देशमुख सुरक्षित नाही, परभणीचा लॉ चा विद्यार्थी असलेला सोमनाथ सूर्यवंशी सुरक्षित नाही.
खुलेआम एका नेत्याची (बाबा सिद्दीकींची) पोलीस संरक्षण असताना गोळ्या घालून हत्या होते. तर सलमान खानच्या घरावर गोळीबार होतो. वाल्मीक कराड सारखा गुन्हेगार सुरक्षाव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून मोठ्या थाटात सीआयडी ऑफिसात स्वतःच्या गाडीने हजार होतो. ललित पाटील रुग्णालयातून अमली पदार्थांचा व्यवसाय करतो. पोलीस चौकीत गोळीबार करण्याची हिंमत दाखवली जाते. सर्वसामान्यांवर कोयत्याने हल्ले होतात तर कधी पोलिसांवर वार करण्याची हिंमत होते. राज्यातील गंभीर गुन्ह्यांची उजळणी करुन देत सर्वसामान्यांना एफआयआरसाठीही संघर्ष करावा लागतो, याची आठवण अंबादास दानवेंनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीसांना करुन दिली.
आर आर आबा, विलासराव देशमुख फडणवीसांना आठवत नाहीत का?
“या राज्याला सुसंस्कृत आणि जबाबदार नेत्यांचा इतिहास आहे. बोलण्यात चूक झाली म्हणून राजीनामा देणारे आर. आर पाटील आबा आपल्या विस्मरणात गेलेत. एका दिग्दर्शकाला दहशतवादी हल्ल्यानंतर सोबत घेऊन गेल्यामुळे राजीनामा देणारे मुख्यमंत्री विलासराव देशमुख किंवा ड्रेस चेंज करुन असंवेदनशीलता दाखवली म्हणून केंद्रीय गृह खात्याचा राजीनामा देणारे शिवराज पाटील देखील आज देवेंद्र फडणवीस आपल्याला आठवत नाहीत का..?” असा खोचक सवाल अंबादास दानवे यांनी केला.
फडणवीस साहेब, महाराष्ट्राच्या राजकारणात नैतिकतेचा मुद्दा वेशीवर टांगला गेलाय, मात्र ‘एखादी घटना घडत असते’ असं असंवेदनशील वक्तव्य करून जबाबदारी ढकलू नका. हुशार, अभ्यासू आणि विकासपुरुष म्हणवून घेणाऱ्या नेत्यांकडून महाराष्ट्राच्या जनतेची यापेक्षा अधिक अपेक्षा नाही, असा टोलाही अंबादास दानवेंनी लागवला.
हेही वाचा : Ajit Pawar : अजितदादांची दिल्लीत वेगळी चूल; विधानसभेसाठी 30 उमेदवारांची यादी जाहीर, 13 मुस्लिम