छत्रपती संभाजीनगर – महायुती सरकारला राज्यात बहुमत मिळून आता 20 दिवस आणि मुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन आठ दिवस होत आले तरी महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. दुसरीकडे राज्यात खून, अपहरण आणि महिला अत्याचारांच्या घटना वाढल्या असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. तसेच सरकार मधील मंत्री अधिकारी यांची मिलीभगत आहे, त्यातून जनतेच्या आरोग्याशी हे सरकार खेळत आहे. शिंदेंच्या आमदारांनी टक्केवारीचा बाजार मांडला असल्याचा आरोप त्यांनी संजय शिरसाट यांच्यावर केला.
फडणवीसांना जमले नाही तिथे बावनकुळे काय करणार?
मंत्रिमंडळ विस्तारावर अंबादास दानवे म्हणाले की, ज्या बातम्या बाहेर येत आहेत त्यावरुन खाते वाटप करण्यामध्ये अडचण येत असेल तर त्यांनी तीन शिफ्ट प्रमाणे मंत्रीपद वाटप करून घ्यावे, असा टोला शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याने लगावला. महाराष्ट्र हितापेक्षा स्वतःचे हित, मलिदा असलेलं खातं घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. भाजपला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची गरज राहिलेली नाही, असा टोलांनी त्यांनी लगावला.
भारतीय जनता पक्षाकडून शिंदेंची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यावर दानवे म्हणाले की, एवढ्या दिवस फडणवीस शिंदेंकडे जात होते. आता बावनकुळे गेले, बावनकुळे यांचे शिंदे ऐकतील असं वाटत नाही. जे फडणवीसांना जमले नाही, तिथे बावनकुळांना काय जमणार, असा खोचक टोला दानवेंनी लगावला.
बनावट औषधांना तानाजी सावंत जबाबदार
माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर औषध खरेदी प्रकरणी आरोप होत आहेत. त्यावर अंबादास दानवे म्हणाले की, बनावट औषध कंपन्या पोसण्याचे काम मागच्या आरोग्य मंत्र्यांनी केलं आहे. हाफकिन संस्थेकडून कडून खरेदी न करता, वाटेल त्या कंपनीकडून औषध खरेदी केली. सरकार मधील मंत्री, अधिकारी यांची साठंगाठं आहे, त्यातून जनतेच्या आरोग्याशी हे सरकार खेळत आहे, असा गंभीर आरोप दानवेंनी तानाजी सावंत यांच्यावर केला.
टक्केवारीचा बाजार मांडला
शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी टक्केवारीचा बाजार मांडला असल्याचा आरोप दानवेंनी केला. ते म्हणाले की, शिरसाट यांनी टक्केवारीचा बाजार मांडला आहे. यांचा बाजार समोर आणून दाखवायचा का? त्यांच्या भ्रष्टाचाराचे व्हिडिओ-ओडिओ समोर अणायाचा का? असा इशाराच दानवेंनी शिंदेंचे आमदार शिरसाट यांना दिला.
सामान्य माणसाला बीडमध्ये राहणे अवघड
बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली. अंबादास दानवे यांनी काल बीडला भेट दिली, या घटनेवर दानवे म्हणाले की, बीडच्या पोलीस अधिकाऱ्यांना भेटलो, सरपंच देशमुख यांच्या कुटुंबाला भेटलो, अशा घटना घडल्या की हृदयाला वेदना होतात. पोलीस पाहिजे तसा तपास करत नाहीत हे सत्य आहे, आता पुन्हा एकदा बीडला गोळीबारची घटना घडली आहे. वारंवार अशा घटना घडत असाताना गुन्हेगारीला संरक्षण कोण देत आहे? असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. सर्वसामान्य माणूस जगू शकत नाही अशा प्रकारची स्थिती बीडमध्ये आहे.
हेही वाचा : Thackeray Vs BJP : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची औकात नाही; बावनकुळेंची जहरी टीका
Edited by – Unmesh Khandale