मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी आता काहीच तास शिल्लक आहेत. सगळेच राजकीय पक्ष, आघाड्या आपापली राजकीय गणितं सांभाळत आहेत. सत्तास्थापनेच्या दृष्टीने सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच शिवसेना – ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका गोष्टीची आठवण करून दिली आहे. (Shiv Sena ubt leader sushma andhare has taken a dig at chief minister eknath shinde reminding him of his old statement)
बुधवारी मतदान झाले आणि त्याच दिवशी संध्याकाळी एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली. या एक्झिट पोलच्या कलानुसार महायुतीचेच सरकार पुन्हा येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, नेमके चित्र शनिवार, 23 तारखेलाच समोर येणार आहे.
हेही वाचा – Maharashtra Election 2024 : भाजपाची रणनिती, अपक्ष-बंडखोरांना गळाला लावण्यासाठी सहा नेते मैदानात
मात्र, त्यापूर्वी पूर्वतयारी म्हणून महायुती आणि महाविकास आघाडीने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. अपक्ष, बंडखोर तसेच समविचारी पक्षांना सोबत घेण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्यापूर्वी परस्परांवर टीका करण्याचे उद्योग देखील सुरू झाले आहेत. असेच एक ट्वीट शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे. याद्वारे त्यांनी शिंदे यांना त्यांच्याच एका वक्तव्याची आठवण करून दिली आहे.
त्या वक्तव्याचा फोटो टाकत, सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही…असे ट्वीट केले आहे. माझ्यासोबत असलेल्या 50 आमदारांपैकी एकही जण पडणार नाही, तसे झाल्यास मी राजकारण सोडेन असं मुख्यमंत्र्यांनी मागे म्हटलं होतं. त्याचीच आठवण अंधारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना करून दिली आहे.
हेही वाचा – Sharad Pawar : एक्झिट पोल सोडा, शरद पवारांनी सांगितला मविआला मिळणाऱ्या जागांचा आकडा
महाविकास आघाडीकडून रणनिती आखण्यास सुरुवात
राज्यातील एक्झिट पोलमध्ये वेगवेगळे अंदाज समोर येत असले तरी त्याचे कल महायुतीकडे दिसत आहेत. एक्झिट पोलमध्ये काही समोर आले असले तरी महाविकास आघाडीकडून सरकार स्थापनेसाठी हालचालीस सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतमोजणी प्रक्रियेची माहिती देण्यात आली. निवडणूक जिंकल्याचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय केंद्र न सोडण्याचे आदेश उमेदवारांना देण्यात आले असून निकाल पूर्ण झाला की तातडीने मुंबईला येण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
Edited by : Ashwini A. Bhatavdekar