Homeमहाराष्ट्रUddhav Thackeray : दादर स्थानकातील हनुमान मंदिराला रेल्वे मंत्रालयाकडून नोटीस; हेच भाजपचे...

Uddhav Thackeray : दादर स्थानकातील हनुमान मंदिराला रेल्वे मंत्रालयाकडून नोटीस; हेच भाजपचे हिंदूत्व आहे का?

Subscribe

मुंबई – बांगलादेशातील हिंदूवर अत्याचार होत आहेत. बांगलादेशातील इस्कॉनचे मंदिर असुरक्षित असल्याचे म्हटले जात आहे, तेव्हा विश्वगुरु नरेंद्र मोदी कुठे आहेत? असा खोचक सवाल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार होत आहे, त्यावर नरेंद्र मोदींनी भूमिका स्पष्ट करावी असे म्हटले आहे. त्यासोबतच दादर स्टेशन येथील 80 वर्षांचे हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस केंद्र सरकारच्या अखत्यारीतील रेल्वे विभागाने दिली आहे, त्यावर नरेंद्र मोदींची भूमिका काय आहे, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.

Shiv Sena UBT Question on Dadar Railway station Hanuman Mandir Notice urk
दादर स्थानकातील हनुमान मंदिराला रेल्वे विभागाने नोटीस बजावली आहे

हिंदुत्व फक्त निवडणुकीपूरते…

भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारात बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है असा नारा दिला होता. त्यानंतर आता महायुतीचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. त्यामुळे भाजपचे हिंदुत्व हे फक्त निवडणुकीपुरते आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी राज्यसभा सदस्य संजय राऊत देखील उपस्थित होते.

नवी मुंबईत सिडकोने देखील मंदिरासाठीचे मैदानाचे आरक्षण बदलले आहे, हेही ठाकरेंनी यावेळी लक्षात आणून दिले. बांगलादेशातील हिंदूबद्दल आणि दादर रेल्वे स्थानकातील मंदिराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाची काय भूमिका आहे, हे त्यांनी जाहीर करावे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. भाजप नेते हे रामभक्त असल्याचे सांगत असतात आता खऱ्या राम भक्ताचे – हनुमानाचे मंदिर पाडण्याची नोटीस दिली जाते, हीच तुमची भक्ती आहे का, असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी केला.

Uddhav Thackeray : दादर स्थानकातील हनुमान मंदिराला रेल्वे मंत्रालयाकडून नोटीस; हेच भाजपचे हिंदूत्व आहे का?

दादर स्थानकातील हनुमान मंदिराला रेल्वे विभागाची नोटीस

दादर पूर्व येथील दादर रेल्वे स्थानकालगत हनुमान मंदिर आहे. 80 वर्षांपासून हे मंदिर येथे आहे. दादर रेल्वे स्थानकातील हमालांनी या मंदिराची स्थापना केली आहे. दादर स्थानकातील हमाल आणि हिंदू कॉलनी परिसरातील लाखो भाविकांचे हे मंदिर श्रद्धास्थान आहे. या मंदिराला काढून घेण्याची नोटीस मंदिर विश्वस्त समितीला बजावण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 12 जवळ आरपीएफ ऑफिसजवळ हे हनुमान मंदिर आहे. आठ दशकांपूर्वी स्थानकातील हमालांनी या मंदिराची स्थापना केली. याच ठिकाणी साई बाबांचेही छोटे मंदिर आहे. आठ दशकांपासून असलेले हे मंदिर बेकायदा असल्याचे सांगत ते पाडण्यासाठी मध्य रेल्वेच्या कार्यकारी सहायक मंडल इंजिनियर यांनी नोटीस बजावली आहे. सात दिवसात हे बेकायदा बांधकाम पाडावे अन्यथा रेल्वे विभागाकडून बांधकाम हटवण्यात येईल, त्याचा खर्चही विश्वस्तांकडून वसूल केला जाईल, असे नोटीशीत म्हटले आहे.

हेही वाचा : UBT On Bangladesh Hindu violence : जिथे घटना घडतायत तिथे धमक दाखवा, ठाकरेंचे मोदींना आव्हान

Edited by – Unmesh Khandale