मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 20 तारखेला झाली, आणि 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर झाले. मात्र या निकालाचे कवीत्व तीन दिवसानंतरही संपलेले नाही आणि पुढील अनेक दिवस संपणार नाही, असा हा निकाल आहे. महायुतीला 237 एवढ्या विक्रमी जागा मिळाल्या. मात्र यातील काही ठिकाणी हिंसक घटना, हाणामारी आणि मतदान केंद्र फोडण्यापर्यंतच्याही घटना घडल्या. बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातील घाटनांदूर येथे मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. धनंजय मुंडे यांच्या गुंडांनी लोकशाही पायदळी तुडवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराने केला होता. महाविकास आघाडी आणि शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी या मतदान केंद्रावर बोगस मतदान सुरु असल्याचा आरोप केला होता. परळी मतदारसंघातील विविध मतदान केंद्रावरील व्हिडिओ देखील समाजमाध्यमावर पोस्ट केले गेले होते. आता परळीतील असाच एक व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटाचे नेते राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी ट्विट केला आहे. येथे होत असलेला राडा आणि निवडणूक प्रक्रियेची तुलना त्यांनी पाकिस्तानशी केली आहे.
परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) धनंजय मुंडे एक लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख उमेदवार होते. त्यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून दहशतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप केला होता. आता खासदार संजय राऊत यांनी परळीतील एक व्हिडिओ ट्विट करत म्हटले आहे की, पाकिस्तान, अफगाणिस्तानमध्ये सुद्धा अशा निवडणुका होत नसतील.
लोकशाहीतील विचलित करणारे हे दृश्य आहे परळी मतदार संघातील.
अशा प्रकारच्या निवडणुका पाकिस्तान अफगाणिस्तान मध्ये सुद्धा होत नसतील.
मतदाराना केंद्रावर येऊच दिले नाही.
दहशत माजवून पळवून लावले.
निवडणूक आयोग जिवंत आहे काय?
@ECISVEEP
@AmitShah
@Dev_Fadnavis pic.twitter.com/A7GbGeDwHu— Sanjay Raut (@rautsanjay61) November 26, 2024
परळीतील 122 मतदान केंद्र संवेदनशील
परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात माधव जाधव हे मतदान केंद्रावर गेले असता धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. परळी मतदारसंघातील 122 मतदान केंद्र संवेदनशील असून त्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त लावण्याची मागणी जाधव यांनी केली होती. जाधव यांच्या मागणीचा हाच राग मनात धरुन त्यांच्यावर धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप जाधव यांनी केला. दरम्यान, त्याचे पडसाद घाटनांदुर मतदान केंद्रावर पाहायला मिळाले होते, तेव्हापासून हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यावर निवडणूक आयोगाकडून काय कारवाई झाली याची अद्याप माहिती नाही.
Edited by – Unmesh Khandale