(Shiv Sena UBT Vs BJP) मुंबई : सरकार गुलियन बॅरी सिंड्रोम आजाराशी कसे लढणार, जीबीएसबाबत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नेमकी कोणती कठोर पावले उचलली आहेत, ते समजायला मार्ग नाही; की भाजपाच्या धोरणानुसार ‘जय श्रीराम’चा नारा दिल्याने गुलियन सिंड्रोम पळून जाईल? ‘गो कोरोना गो’ अशा घोषणांप्रमाणे ‘गो गुलियन गो’ असे नारे रुग्णालयाबाहेर द्यायचे की घंटा, थाळ्या, चमचे-वाट्या वाजवून गुलियनविरोधात लढा पुकारायचा याबाबतचे स्पष्ट मार्गदर्शन होणे गरजेचे आहे, असा टोला माजी मुख्यमंत्री प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. (Thackeray taunts BJP about GBS)
लोकांच्या मनात गुलियनची भीती आहे आणि सरकार बिनधास्त आहे. हा आजार नेमका काय आणि कसा याची पाहणी करण्यासाठी म्हणा, केंद्राचे एक पथक महाराष्ट्रात आले आणि कोणतीही पाहणी न करता निघून गेले. हे खरे असेल तर गुलियन आजारापेक्षा ही बाब गंभीर आहे, अशी खोचक टीका सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
हेही वाचा – Thackeray about Mahayuti : जीबीएसचे संकट असताना हेवेदाव्यांमुळे राज्य सरकार कोमात, ठाकरेंचा हल्लाबोल
महाराष्ट्रात ‘गुलियन’ शिरला आहे आणि मंत्री परिषद त्याबाबत सतर्क नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. खरे तर मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतील प्रचार दौरा थांबवून ‘जीबीएस’ रोखण्यासाठी म्हणजे गुलियनला संपविण्यासाठी महाराष्ट्रातच थांबायला हवे होते, पण राजकीय कर्तव्य, निवडणुका, महत्त्वाच्या असल्याने महाराष्ट्रात गुलियनला मोकाट सोडून मुख्यमंत्री दिल्लीत आहेत, असा निशाणा त्यांनी साधला आहे.
गुलियनवर ‘ईव्हीएम’ फेकून मारल्याने त्याची पीछेहाट होईल की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैशांचा पाऊस पाडल्याने हा व्हायरस वाहून जाईल? लोकांना काहीच कळेनासे झाले. लोक घाबरलेले आहेत. गुलियनचे करायचे काय? हा प्रश्नच आहे, असा कोपरखळीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
काय आहे हा आजार?
जीबीएस आजार विषाणू किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होतो. या आजाराने थकवा येतो. हातापायाला मुंग्या येतात. श्वास घेताना अडथळे येतात. जीव घाबरा होतो. ही लक्षणे गंभीर आहेत. जीबीएस हा एक असा विचित्र आजार आहे, यात रोगप्रतिकारशक्ती स्वतःच्याच शरीरावर हल्ला करते. ही शक्ती शरीरातील मज्जासंस्थेवर हल्ला करते. नसांना प्रभावित करते. त्यामुळे मेंदूच्या कामकाजावर गंभीर परिणाम होतो. ही लक्षणे गंभीर आहेत आणि रुग्णाला त्याची मोठी किंमत चुकवावी लागते, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे. (Shiv Sena UBT Vs BJP: Thackeray taunts BJP about GBS)
हेही वाचा – Munde Vs Opposition : धनंजय मुंडेंभोवतीची राष्ट्रवादीची तटबंदी मजबूत, राजीनामा घेण्याची शक्यता कमीच