राज्यातील मराठवाड, विदर्भाला परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. मोठ्याप्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. कापणीला आलेलं उभं पिक पावसात वाहून गेलं. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी चिंतेत असून सरकारकडून मदतीची प्रतिक्षा करत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे 23 ऑक्टोबरपासून दोन दिवशीय मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत.
मराठवाड्यात गेल्या 15 दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसामुळे पूर्ण भिजून वाहून गेले आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. दरम्यान विरोधकांकडून सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे, मात्र राज्य सरकारने कोणतेही ठोस पाऊल न उचलत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.
शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेऊन त्यांना तातडीने मदत कशी करता येईल याची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे रविवार दिनांक 23 ऑक्टोबर 22 रोजी संभाजीनगरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना शासकीय मदत लगेच कशी मिळवून देता येईल यासाठी ते शिवसेनेची यंत्रणा कार्यान्वीत करणार आहेत.
उद्धव ठाकरे उद्या सकाळी 11 ते 12 दरम्यान औरंगाबादकडे जाण्यासाठी निघणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत ते ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्याची शक्यता आहे.