घरमहाराष्ट्रसत्तेसाठी शिवसेनेेकडून राष्ट्रवादीच्या गाठीभेटी

सत्तेसाठी शिवसेनेेकडून राष्ट्रवादीच्या गाठीभेटी

Subscribe

काँग्रेसही बाहेरून देणार पाठिंबा,तिन्ही पक्षांचे संख्याबळ १६७ ,शरद पवार यांना भेटले संजय राऊत

दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी ते वक्तव्य करायला नको होते, अशी नवनिर्वाचित आमदारांसमोरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मन की बात’ बोलून दाखविल्यानंतर काही तासांतच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे पडद्यामागे राजकारणाचा सारीपाट बदलण्याचे दबावतंत्र सुरु असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने आम्ही भाजपसोबत नाही, अशी जाहीर आणि ठाम भूमिका घेतल्यास दुसर्‍याक्षणी आमचा त्यांना बाहेरून जाहीर पाठिंबा असेल, असे काँग्रेसचे नेते दबक्या आवाजात बोलत आहेत.‘हीच ती वेळ’ आहे शिवसेनेला स्वाभिमान दाखविण्याची आणि शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याची, अशी कोपरखळी काँग्रेसच्या एका नेत्याने मारली.

त्यामुळे ऐन दिवाळीत ‘मी पुन्हा येईन’, असे प्रसार माध्यमांना ठणकावून सांगणार्‍या भाजपच्या गोटात कमालीची शांतता आहे. तर संजय राऊत या आपल्या विश्वासू शिलेदाराला पवारांच्या दरबारी पाठवून उद्धव ठाकरे हे एक घाव दोन तुकडे करण्याच्या विचारापर्यंत आल्याचे शिवसेनेच्या एका कॅबिनेट मंत्र्यांने राज्यपालांच्या भेटीनंतर सुतोवाच केले आहे.

- Advertisement -

याबाबत ससपेन्स कायम आहे. राज्याच्या सत्तेत समान वाटा मिळावा, असा धोशा शिवसेनेने निकालाच्या दिवसांपासून लावला होता. मात्र भाजपकडून मुख्यमंत्रीपद असो किंवा समान खातेवाटप, भाजपने शिवसेनेच्या एकाही मागणीला हिंग लावूनदेखील विचारलेले नाही. एका बाजूला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ’जे ठरलंय तेच आम्ही मागतोय’, असे सांगत आहेत.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीदरम्यान सत्तावाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचे सांगितले. या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचे वृत्त समोर येत आहे. खुद्द राऊत यांनीच ‘मी पवारांची सदिच्छा भेट घेतली असून त्यांना दिवाळीच्या सदिच्छा दिल्या’, असे माध्यमांना सांगितले. दिवाळी झाल्यानंतर राऊत यांनी पवारांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या असतील तर राज्याच्या राजकारणात दिवाळीनंतर मोठे फटाके फुटणार, असाच अंदाज आहे.

- Advertisement -

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार यांच्यातील दिल्लीतील सख्य संपूर्ण देशाला माहीत आहे. याबद्दल वेगळे सांगण्याची गरज नाही. भाजप-शिवसेनेतील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असताना संजय राऊत यांनी घेतलेली पवारांची भेट भाजपच्या गोटात नक्कीच खळबळ उडवणारी आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले तर १६७ आमदारांचे भक्कम पाठबळ शिवसेनेला मिळू शकते. मात्र २५ ऑक्टोबर रोजी माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले होते की, “शिवसेनेला फक्त महायुतीतून नाही तर भाजपच्या प्रभावातून बाहेर पडावे लागेल, तरच आम्ही दिल्ली दरबारी तसा प्रस्ताव मांडू शकतो.” शिवसेनेने जर कणा दाखवला तर राज्याच्या राजकारणात भूंकप होईल, हे नक्की.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -