भाजपाचे तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म नाही, जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा एल्गार

Uddhav Thackeray on BJP | उद्धव ठाकरेंकडून पुन्हा एकदा पक्षबांधणीला सुरुवात झाली आहे. जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुखांसोबत आज त्यांनी शिवसेना भवनात बैठक घेतली. यावेळी त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना कानमंत्र दिला.

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray on BJP | मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदे गटाला बहाल केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आता विधिमंडळातील कार्यालयावरही शिंदे गटाने कब्जा मिळवला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसैनिकांची खचून न जाता आत्मविश्वासाने लढाई लढण्याचे आवाहन केले आहे. तसंच, सुपारी देऊन शिवसेनेची हत्या करण्याचा प्रयत्न होतोय, असा मोठा दावाही त्यांनी केलाय. उद्धव ठाकरेंकडून पुन्हा एकदा पक्षबांधणीला सुरुवात झाली आहे. जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुखांसोबत आज त्यांनी शिवसेना भवनात बैठक घेतली. यावेळी त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना कानमंत्र दिला.

सुपारी देऊन शिवेसनेची हत्या करण्याचा प्रयत्न होतोय. पण, भाजपाचे तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर शिवसेना संपेल असा दावा करण्यात येत होते. पण तरीही आपण जिंकलो. अशीच परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. त्यामुळे आताही त्याच निर्धाराने उभं राहण्याची गरज आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा – मोठी बातमी! शिवसेना आणि धनुष्यबाण घेतल्यानंतर विधिमंडळातील कार्यालयावरही शिंदे गटाचा कब्जा

विधिमंडळातील कार्यालय ताब्यात

दरम्यान, शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाकडे गेल्याने वाग्-युद्ध सुरू झाले आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटात शाब्दिक चकमक सुरू झाली असून अनेक ठिकाणी राडेही झाले. पक्षावर ताबा मिळाल्यानंतर आता शिंदे गटाकडून पक्षाच्या कार्यालयांवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर शिंदे गटाने विधिमंडळातील शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतला आहे. तसंच, इतर कार्यालयेही ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

विधिमंडळातील कार्यालय ताब्यात घेतल्यामुळे संजय राऊत म्हणाले की, ही चोरांची शिरजोरी आहे. त्यांना समोरून लढता येत नाही. तपास यंत्रणा, निवडणूक आयोगाकडून हवे तसे निकाल मिळवायचे आणि ताबा घ्यायचा, हेच सध्या सुरू आहे. हातात यंत्रणा असल्याने त्यांना त्यांच्या महाशक्तीचा पाठिंबा आहे. विधिमंडळाचा ताबा, शिवालयाचा ताबा ही सर्व लढाई औटघटकेची आहे. या राज्यातील जनता, कडवट निष्ठावंत शिवसैनिक आजही बाळासाहेबांच्या वास्तुशी इमान राखून आहेत. ताब्यात घेतलेल्या दोन्ही वास्तू सरकारी होत्या. सरकारकडून मिळालेल्या वास्तू होत्या. सरकार त्यांचं आहे. आज त्यांचं आहे, उद्या त्यांचं असेल याची खात्री नाही. सरकार कोणाचं ठेवायचं हे जनता ठरवते, असंही ते म्हणाले.

हेही वाचा – शिंदे गटाने कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, सरकार कोणाचं…