नाशिक जिल्ह्यात शिवसेनेचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’

नाशिक : शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ खासदारांनीही बंड केल्यानंतर पहिल्यांदाच नाशिक जिल्हा दौर्‍यावर आलेले युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात सभा घेवून त्यांना आव्हान दिले. तर दुसरीकडे शिवसेना सोडून शिंदे गटात सामील झालेले खासदार हेमंत गोडसे यांचे नाशिकमध्ये जंगी स्वागत झाले. शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आणि एकमेकांना आव्हान दिल्यामुळे शुक्रवारी (दि.22) जिल्ह्याभरात शिवसेनेचा हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला.

निष्ठा यात्रेच्या निमित्ताने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे नाशिक जिल्हा दौर्‍यावर आहेत. गुरुवारी नाशिकमध्ये सभा घेत त्यांनी खासदार हेमंत गोडसेंवर शरसंधान साधले. तर शुक्रवारी मनमाड येथे सभा घेत आमदार सुहास कांदे यांच्या ‘निष्ठे’वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गद्दारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नसतो आणि त्यांची लायकीही नाही, अशा शब्दांत त्यांनी आमदारांना झिडकारले. याउलट आदित्य ठाकरे यांना भेटण्याची इच्छा असून, त्यासाठी हजारो कार्यकर्त्यांना घेवून त्यांनी मनमाडमध्येच प्रतिप्रत्युत्तर सभा घेतली. त्यामुळे मनमाड शहरातील वातावरण तंग झाल्याचे दिसून आले. एकिकडे हा सगळा ड्रामा सुरु असताना दुसरीकडे दोन वेळा खासदार राहिलेले हेमंत गोडसे यांचे ढोल-ताश्यांच्या गजरात नाशकात स्वागत करण्यात आले. मुंबई-नाशिक महामार्गावरील घोटी टोलनाक्यापासून त्यांचे स्वागत करण्यात आले. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व टिकवण्यासाठी आपण शिंदे गटात गेल्याचा खुलासा त्यांनी केला.

मात्र, बंडखोर आमदारांच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी नाशिक शहरात काढलेल्या अंत्ययात्रेत खासदार हेमंत गोडसे हेदेखील सहभागी झाले होते. त्यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले होते की, आम्ही पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबत निष्ठेने राहणार आहोत. मातोश्रीवर त्यांना तसा शब्द दिल्याची कबुली गोडसे यांनी दिली होती. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दोन गटांमध्ये शुक्रवारी जुगलबंदी रंगल्याचे दिसून आले. शिवसेनेचे दोन गट परस्परांविरोधात लढत असल्याचे चित्र बघायला मिळाले. दोन-अडीच वर्षांपूर्वी ज्या आदित्य ठाकरेंनी दिवसरात्र एक करुन आमदार, खासदारांचा प्रचार केला. त्यांनाच पाडण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. एकदंरित, शुक्रवारचा संपूर्ण दिवस शिवसेनेच्या राजकीय नाट्यमय घडामोडींनी रंगल्याचे दिसून आले.

– युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आमदार सुहास कांदे यांना टार्गेट केले. गद्दारांची प्रश्न विचारण्याची लायकी नसते. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा आमच्या पाठित खंजीर का खुपसला, याचे उत्तर अगोदर द्या, असा प्रतिसवालही त्यांनी केला. आपले सरकार आले तर मनमाडच्या पाणी पुरवठा योजनेचा पाठपुरावा करण्याचा शब्द दिला होता. त्यानंतर उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना या योजनेसाठी 300 कोटी रुपये मंजूर केले. पण आमदार हे स्वत:ला वाचवण्यासाठी काहीही आरोप करत आहेत. त्यांच्या टिकांना मी उत्तर देत बसणार नाही. गद्दार नसते तर उत्तरे दिली असती. गद्दारांना प्रश्न विचारण्याची लायकी नसते, अशी टिकाही आदित्य ठाकरे यांनी केली. आमदार कांदे यांना मला भेटण्याची इच्छा असेल तर त्यांनी मातोश्रीवर यावे, असा सल्ला देत त्यांनी मनमाडकरांना साद घातली. असले घाणेरडे राजकारण गेल्या अडीच वर्षात मी कधी बघितले नाही. त्यामुळे हे तुम्हाला आवडले का? असा प्रश्न केला असता सर्वांनी एकसूरात नाही म्हटले. दरम्यान, नाशिकमधील काळाराम मंदिराचे दर्शन घेत आदित्य ठाकरे यांनी सर्वांच्या भल्यासाठी मनोकामना केली. यापूर्वी जेव्हा जेव्हा नाशिकला आलो तेव्हा रामाचे दर्शन घेतले. बंडखोरांसाठीच काय कुणासाठीही मातोश्रीचे दरवाजे कधी बंद नव्हते आणि नसणार आहेत. ज्यांना भेटायचे असेल त्यांनी मातोश्रीवर यावे, असे आवाहन त्यांनी केले.
आदित्य ठाकरे आपल्या मतदारसंघात येणार म्हटल्यावर स्वस्थ बसतील ते आमदार सुहास कांदे कसले. त्यांनी लागलीच आदित्य ठाकरेंवर आरोपांचे बाण सोडले. ते म्हणाले, आमच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात पर्यटन विभागाचे एक काम दाखवा, लगेच राजीनामा देतो. मतदार संघातील विकासकामांविषयी आपण आदित्य ठाकरे यांना 100 पत्रं दिले. पण त्यांच्याकडून एकाही पत्राला उत्तर मिळाले नाही. त्यांच्या या भूमिकेमुळेच मतदार संघातील योजना तर रखडल्या पण पाठपुरावा करुन-करुन मी दुबईहून आणलेल्या चपला देखील झिजल्या, असा टोलाही कांदे यांनी मनमाडमध्ये लगावला. आमदारांच्या भेटीगाठी आणि वेळच्या वेळी विकासकामे झाली असती तर आज परिस्थिती वेगळी राहिली असती, असे म्हणत सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राज्यात सत्तांतर तर झालेच पण कामाच्या पध्दतीमध्येही बदल झाला आहे. नांदगावमध्ये छत्रपती शिवरायांच्या आश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी 100 पत्र दिली. पण माझ्या चपला झिजल्या, तिथे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होताच दुसर्‍या दिवशी विकासकामांना परवानगी मिळाली असल्याचे कांदे यांनी सांगितले. त्यामुळे आज पक्ष संघटनासाठी थेट रस्त्यावर उतरावे लागत आहे. योग्यवेळी योग्य निर्णय न घेतल्यानेच ही वेळ आल्याचे कांदे म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या हाती शिवबंधन दिसत नाही. त्यांनी परवानगी दिल्यास आपण शिवबंधन बांधू. आदित्य ठाकरे वाघच आहेत, पण ते मटण खायचे सोडून दाळभात खात असल्याचा टोलाही आमदार कांदे यांनी लगावला.