लोहा-कंधारचा पुढचा आमदार शिवसेनेचा, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

संजय राऊत हे सध्या नांदेडच्या दौऱ्यावर आहेत. याठिकाणी त्यांनी आज (ता. 19 मे) जाहीर सभा घेतली. तर लोहा-कंधारचा पुढचा आमदार हा शिवसेनेचाच असणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Shiv Sena's next MLA from Loha-Kandahar, Sanjay Raut expressed his belief

आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेले आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीमध्ये लोकसभेच्या अनुषंगाने 16-16-16 असा फॉर्म्युला ठरविण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. पण या चर्चांना आता ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी पूर्णविराम लावला आहे. मविआमध्ये जागांविषयी असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नसून 2019 मध्ये लोकसभेच्या ज्या जागा आम्ही जिंकल्या होत्या, त्या आम्ही लढवणारच, असे संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले आहे. संजय राऊत हे सध्या नांदेडच्या दौऱ्यावर आहेत. याठिकाणी त्यांनी आज (ता. 19 मे) जाहीर सभा घेतली. तर लोहा-कंधारचा पुढचा आमदार हा शिवसेनेचाच असणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Shiv Sena’s next MLA from Loha-Kandahar, Sanjay Raut expressed his belief)

हेही वाचा – ‘अंधारेंची त्यात काही चूक नाही’,’जसा पक्षप्रमुख…’ नितेश राणेंचा हल्लाबोल

लोहा-कंधार येथे झालेल्या सभेमध्ये संजय राऊत म्हणाले की, इतक्या उन्हात सगळे जमलेले आहेत, पण शिवसेनेचं तापमान नेहमीच वाढलेल असतं. लोहा-कंधारचा पुढचा आमदार हा शिवसेनेचा असायला पाहिजे. तो आमदार असा निवडून द्या, की खोक्याला विकला जाणार नाही. आजचं लोह्यातील वातावरण पाहून वाटले की, परत परत यायला पाहिजे. लोहा-कंधार मजबूत आहे. लोहा मारो, असे संजय राऊत हे उद्धव ठाकरेंना सांगणार असल्याचे यावेळी त्यांच्याकडून सांगण्यात आले.

लोहा-कंधार यापुढे आपले राहील याची काळजी घ्या…
मराठवाडा, नांदेड हे सगळं काही शिवसेनेचेच आहे. लोहा-कंधारही शिवसेनेचंच होतं. पण यापुढे ते आपलंच राहिल याची काळजी घ्या. मशाल माझ्या हातात दिली. त्याने पेटवू सगळं. पेटवायला किती वेळ लागतो, असेही यावेळी राऊत म्हणाले.

हे पाप त्यांना पचणार नाही..
जे पाप भाजप आणि मिंधे गटाने केले आहे ते त्यांना पचणार नाही. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. आजही मराठवाड्याची बाळासाहेबांवर तितकीच श्रद्धा आणि प्रेम आहे. सत्ता येते सत्ता जाते. पण सत्तेच्या माध्यमातून आपण जनतेला, राज्याला त्या मातीला काय दिलं, याचा हिशोब द्यावा लागतो, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

आजारपणाचा गैरफायदा घेत पक्ष फोडला..
उद्धव ठाकरे हे अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले. पण त्यांनी त्यावेळी त्यांच्याकडे कोणी बोट दाखवेल, असे कोणतेही काम केले नाही. शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी काम करत त्यांनी कोरोना काळात सर्वांची काळजी घेतली. पण त्यांच्या आजाराचा गैरफायदा घेऊन पक्ष फोडला. पण शिवसेना असा नष्ट होणारा पक्ष नाही. 5-10 लोक गेल्याने 50 ते 55 वर्षांची शिवसेना संपणार नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांसमोर मोदी-शाहांना गुडघे टेकावे लागतील, त्यांना झुकावे लागेल, असे म्हणत त्यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदारांवर आणि मोदी-शाह यांच्यावर निशाणा साधला.