व्यापाऱ्यांना विम्याची ५० टक्के रक्कम तात्काळ द्या; सेना-राष्ट्रवादीच्या खासदारांची अर्थमंत्र्यांकडे मागणी

Shiv Sena and NCP MPs meeet Union Finance Minister Nirmala Sitharaman
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेतली.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे व्यापारी वर्गाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेत विम्याची रक्कम तातडीने देण्याची मागणी केली. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी, राहुल शेवाळे आदी खासदारांनी निर्मला सीतारामन यांची आज भेट घेतली.

निर्मला सीतारमण यांना राज्यातील पूरस्थितीची माहिती दिली. यावेळी व्यापाऱ्यांना तातडीने ५० टक्के विम्याची रक्कम मिळण्यासाठी विमा कंपन्यांना आदेश देण्याची मागणी केली. याबाबतचं निवदेन देखील अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना दिलं. अतिवृष्टी आणि त्यामुळे आलेल्या महापुरामुळे रायगड जिल्ह्याचं आतोनात नुकसान झालं आहे. व्यापाऱ्यांचंही प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र, विमा कंपन्या पाण्यात भिजलेलं सर्व अन्नधान्य आणि इतर साहित्य पाहूनच नुकसान भरपाई देत असतात. विमा कंपन्यांचे अधिकारी येण्यासाठी वेळ लागतो. जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी हे व्यापारी झगडत आहेत. अशावेळी या व्यापाऱ्यांना विमा कंपन्या याच एकमेव आधार आहेत, असं खासदार सुनिल तटकरे यांनी त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे.

शरद पवारांसारखा निर्णय घ्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी २०५ मध्ये केंद्रीय कृषी मंत्री असताना पूरग्रस्तांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला होता. पुरात नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना तात्काळ ५० टक्के अर्थसहाय्य देण्याचे आदेश पवारांनी दिले होते. तुम्हीही त्याच धर्तीवर विमा कंपन्यांना आदेश देऊन व्यापाऱ्यांना ५० टक्के आर्थिक मदत मिळवून द्यावेत. जेणेकरून महाड, खेड, चिपळूण आणि रायगडमधील पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळेल, अशी विनंती तटकरे यांनी शेवटी केली आहे.