छत्रपतींच्या वंशजाचा सन्मान राखायला हवा होता, शिवेंद्रराजे भोसलेंची महाविकास आघाडीवर टीका

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघारी घेतली आहे. मात्र, त्यांनी माघार घेतल्यानंतर अनेक पक्षांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, छत्रपती घराण्यातील वंशजाचा महाविकास आघाडीने सन्मान राखायला हवा होता, असं वक्तव्य भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केलं आहे.

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधीच माघार घ्यावी लागली. छत्रपती संभाजीराजेंचा ठरवून गेम करण्यात आला आहे. त्यांच्या बाबतीत जे काही घडलं, कोणी घडवलं, हे सर्व संभाजीराजांना माहिती आहे. सर्वांनी मिळून संभाजी राजांचा ठरवून गेम केला आहे, अशी टीका शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केली आहे.

छत्रपती घराण्यातील वंशजाचा महाविकास आघाडीने सन्मान राखायला हवा होता

संभाजीराजेंच्या पाठीमागे महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज उभा आहे. त्यांच्या गडकिल्ले संवर्धनाचं काम, मराठा आरक्षण लढाईत त्यांचं योगदान अमुल्य आहे. अशावेळी छत्रपती घराण्यातील वंशजाचा महाविकास आघाडीने सन्मान राखायला हवा होता, असं शिवेंद्र राजे म्हणाले.

तुम्ही त्यांच्या पक्षात जाणार का?

संभाजीराजे छत्रपतींनी स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यास तुम्ही त्यांच्या पक्षात जाणार का?, असा सवाल पत्रकारांकडून विचारण्यात आला तेव्हा शिवेंद्रराजे म्हणाले की, मी आता भाजपचा आमदार आहे. ज्या पक्षाबरोबर मी आहे, त्यांच्यासोबतच रहाणं चांगलं आहे. उगाचच या पक्षातून त्या पक्षात जाणे योग्य ठरणार नाही, असं शिवेंद्र राजे म्हणाले.


हेही वाचा : आम्हाला शब्द वाढवायचा नाही, सहाव्या जागेचा विषय आता संपलाय, संजय राऊतांचं संभाजीराजेंच्या आरोपांवर प्रत्युत्तर