पुणे : शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी आणि जुन्नर येथे दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव’ निधीत महायुती सरकारने पाच कोटी रूपयांची कपात केली आहे. हा निधी महाबळेश्वर महोत्सवाकडे वळवला. शिंदे गटातील एका मंत्र्याने हा ‘प्रताप’ केल्याचे बोलले जाते. त्यामुळे शिवप्रेमींकडून महायुती सरकारविरोधात एक संताप व्यक्त केला जात आहे.
गतवर्षी शिवजयंती उत्सवासाठी राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने नऊ कोटी रूपयांचा खर्च केला होता. यंदा तो चार कोटी रूपयांपर्यंत खाली आणण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार शिवजयंतीच्या निधी कपातीवर गप्प आहेत. तर, पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांनी सुद्धा आवाज उठवलेला नाही.
2024 मध्ये लोकसभेसह विधानसभेची निवडणूक होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीवर शिवजन्मोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेण्यात आले. त्यावर एकूण नऊ कोटी रूपये खर्च झाले. यंदादेखील याच दर्जाचे कार्यक्रम महोत्सवासाठी नियोजित होते. मात्र, निधीअभावी कार्यक्रमांना हालचाली लावण्याच्या सुरू आहेत.
तत्कालीन पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दरवर्षी शासनाच्या वतीने पाच दिवस शिवजयंती महोत्सव आयोजित करण्याची घोषणा केली होती. पण, यंदा दोन दिवसांची कपात करण्यात आली आहे. हा महोत्सव तीन दिवसांचा केला आहे. 17 ते 19 फेब्रुवारीदरम्यान ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव 2025’चे आयोजन करण्यात आले आहे. शिवजयंती महोत्सवाराच्या निधीत 60 टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वनियोजित अनेक कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे.
शिंदे गटातील मंत्र्याचा प्रताप?
शिवनेरी महोत्सवाला देण्यात येणाऱ्या नऊ कोटी रूपयांच्या निधीत पाच कोटी रूपयांची कपात केली आहे. कपात केलेला निधी महाबळेश्वर महोत्सवाकडे वळता केल्याची चर्चा आहे. महाबळेश्वर महोत्सवाला दरवर्षी तब्बल 14 कोटींचा निधी देण्यात येतो. यंदा तो 21 कोटी रूपये करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील शिंदे गटातील मंत्र्याने हा ‘प्रताप’ केल्याचं बोलले जात आहे. एका मराठी वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे.