सांगली : शिवराज राक्षेसोबत जे घडलं, ते चुकीचे आहे. 20 वर्षांची मेहनत 10 सेकंदात वाया घालवणार असेल, तर हे योग्य नाही. शिवराज राक्षेने पंचाला गोळ्या घालायला पाहिजे होत्या, अशी संतप्त प्रतिक्रिया डबल महाराष्ट्र केसरी, शिवसेना ( ठाकरे गट ) नेते चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केली आहे.
अहिल्यानगर येथे 67 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चांगलीच वादात सापडली आहे. कुस्तीपटू पृथ्वीराज मोहोळ यांनी कुस्तीपूट शिवराज राक्षे याचा पराभव केला. यानंतर पंचाने चुकीचा निर्णय दिल्याचे सांगून शिवराज राक्षे याने पंचाची कॉलर धरली आणि नंतर त्याला लाथ मारली. यावरून बराच वाद रंगला असून विविध प्रतिक्रिया उमटत आहे. चंद्रहार पाटील यांनीही एकच संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा : ‘हेंद्र्या तुला बोललो का? तुझा उद्योग बघ ना, तू काय…’ जरांगे-पाटील वडेट्टीवारांवर संतापले
चंद्रहार पाटील म्हणाले, “कुस्ती स्पर्धेत जे झाले, ते चुकीचे होते. मॅटवर असणाऱ्या पंचाची चूक आहे. एका अंगावर असताना कुस्ती ( निकाल दिला ) देण्यात आली. माझ्या तिसऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत असाच प्रकार घडला होता. शिवराज राक्षेने जी लाथ मारलेली, ती चुकीची होती, असे मी म्हटले होते. मात्र, जो पंच होता, त्याला गोळ्या घातल्या पाहिजे होत्या.”
“15-20 वर्षांची तपस्या करून तो महाराष्ट्र केसरीत तिसऱ्यांदा पोहोचला होता. तुम्ही 10 सेकंदात त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहात. पंचांना अशा प्रकारे शिक्षा मिळाली, तर पुढील काळात कुस्ती क्षेत्रात पंचांवर वचक बसेल,” असं चंद्रहार पाटील यांनी सांगितलं आहे.
“2007, 2008 साली मी महाराष्ट्र केसरी झालो. तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी लढवणार मी 60 वर्षांतला पहिला पैलवान होतो. माझ्याबाबतही असेच घडले होते. माझ्या बाबतीत जे घडले, त्यानंतर मी आत्महत्येचा विचार केला होता. तो माझा विचार चुकीचा होता. शिवराजने खरेतर त्या पंचाला गोळी घालून कुस्ती क्षेत्राला संदेश दिला पाहिजे. या गोष्टीपासून पंचांनी लांब राहिले पाहिजे. ज्या प्रेक्षकांना कळत नाही, त्यालाही ही कुस्ती बरोबर झाली नाही, हे कळते. यात पृथ्वीराजची चूक नाही. पृथ्वीराज महाराष्ट्र केसरी आहे, त्याचे मी अभिनंदन करतो. पुन्हा स्पर्धा होणे शक्य नाही. शिवराजबाबत जे घडले, ते अन्यायकारण आहे,” असंही चंद्रहार पाटील म्हणाले.
“शिवराजने गोळ्या घातल्या पाहिजे, मी यासाठी म्हणतोय, कारण 15-20 वर्षे तो मेहनत घेतोय. पैलवानांचा दिवस पहाटे 3 वाजता सुरू होतो. सण उत्सव नसतो. सुट्टी नसते. त्यातून तो इथपर्यंत पोहचतो. अशावेळी चुकीच्या निर्णयामुळे शिवराजला बाद व्हावे लागले, हे योग्य नाही,” असेही मत चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केले.
हेही वाचा : जरांगे-पाटील यांची मुख्यमंत्री फडणवीसांना वॉर्निंग; म्हणाले, ‘संयम सुटला तर मी…’