न्यायाची घंटाच चोरीला गेल्यावर तुमच्या किंकाळ्यांना विचारतंय कोण?, बिल्किस बानोप्रकरणी शिवसेनेचा बोचरा सवाल

'न्यायाची घंटाच चोरीला गेल्यावर बिल्किस असो की बिमला, तुमच्या किंकाळ्यांना विचारतंय कोण?' असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. 

मुंबई – बिल्किस बानो प्रकरणावरून पुन्हा एकदा वादंग निर्माण झालाय. या प्रकरणातील ११ दोषींना गुजरात सरकारने तुरुंगातून सोडून दिल्याने विरोधकांकडून टीकास्त्र सोडलं गेलंय. त्यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामानातील ‘रोखठोक’ सदरातून निशाणा साधण्यात आलाय. ‘न्यायाची घंटाच चोरीला गेल्यावर बिल्किस असो की बिमला, तुमच्या किंकाळ्यांना विचारतंय कोण?’ असा सवाल शिवसेनेने विचारला आहे.

काय म्हटलंय लेखात?

बलात्कार आणि खुनास राजमान्यता आणि समाजमान्यता देण्याचा प्रकार घातक आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा श्री. अधिरंजन चौधरी यांनी करताच स्मृती इराणींपासून समस्त भाजपास तो नारी शक्तीचा अपमान वाटला व न्यायासाठी ते सर्व तोंडाची घंटा वाजवीत राहिले. श्रीमती इराणी यांचा संताप पाहण्यासारखा होता. मग बिल्किस प्रकरणात या सर्व घंटा थंड का? बिल्किस एक स्त्री आहे. तिने तिची इज्जत व स्वतःची मुलगी गमावली. त्या अन्यायाविरोधात ती एकाकी झुंजली. मोदी हे गुजरातला जातात तेव्हा त्यांनी या अत्याचारग्रस्त भगिनीच्या घरी जाऊन तिला आधार द्यायला हवा होता. प्रश्न इथे हिंदू -मुसलमानाचा नाही. तर हिंदुत्वाचा आत्मा आणि आपल्या महान संस्कृतीच्या प्रतिष्ठेचा आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत हिंदूंची मते मिळावीत म्हणून बिल्किसचे गुन्हेगार सोडले असतील तर ती प्रवृत्ती देशविघातक आहे. मग देशाला अतिरेक्यांपासून धोका आहे असे बोलण्यात अर्थ नाही. धोका तर देशातच आहे. धर्माचे रुपांतर ध्रमांधता व अराजकतेत होत आहे.

हेही वाचा – तारीख पे तारीख… थांबणार कधी?

अशा बिल्किस बानो सर्वच समाजात असू शकतात. त्या काश्मीर खोऱ्यात आहेत. महाराष्ट्रात आहे. प्रत्येत राज्यांत आहेत. त्या हिंदू आहेत, मुसलमान आहेत, ख्रिश्चन आहेत. न्यायासाठी त्यांचा आक्रोश सुरूच आहे. पण कधी कदी न्यायाच्या घंटेपर्यंत हात पोहोचण्याआधीच तिच्या देहाचे कलेवर होते. उत्तर प्रदेशात अशा अनेक घटना घडल्या. जहांपनाहपर्यंत त्यांच्या किंकाळ्या पोहोचल्याच नाहीत. कारण न्यायाची घंटाच चोरीला गेली. अस्वस्थ मनाने बिल्किस बानो काय म्हणते ते पहा, मी आता काय बोलू? न्याय व्यवस्थेवरील माझी श्रद्धा दोषींच्या मुक्ततेमुळे डळमळीत झाली आहे. मी सुन्न झाले आहे. या स्थितीत कोणाही महिलेला न्याय कसा मिळेल?आपल्या देशातील सर्वोच्च न्याया व्यवस्थेवर माझा विश्वसा होता. बिल्किस पुढे सांगते ते महत्त्वाचे. १५ ऑगस्ट रोजी या अकरा दोषींना मुक्त केल्याचा निर्णय समजताच २० वर्षांपूर्वी माझ्यावर झालेला आघात पुन्हा झाल्यासारखे वाटले. माझे आणि माझ्या कुटुंबाचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या, माझ्या तीन वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्या ११ दोषी व्यक्ती सध्या मोकळेपणाने वावरत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आता याप्रकरणी गुजरात सरकारला नोटीस बजावली आहे. ्तयावर दोन आठवड्यांत सुनावणी होईल, पण आज ते ११ जण मोकळे आहेत व समाज चूप आहे. हेच आपले स्वातंत्र्य म्हणायचे काय? त्याच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला. त्याच स्वतंत्र भारतात सर्वोच्च न्यायलये आहेत. पण न्यायाची घंटा चोरीला गेलीय! न्यायाची घंटाच चोरीला गेल्यावर बिल्किस असो की बिमला, तुमच्या किंकाळ्यांना विचारतंय कोण?