घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसेना भाजपमध्ये तुफान दगडफेक

सेना भाजपमध्ये तुफान दगडफेक

Subscribe

कार्यकर्ते समोरासमोर भिडले, वातावरण तणावग्रस्त

शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. शिवसेना कार्यालयावर चालून येणार्‍या भाजप कार्यकर्त्यांवर शिवसैनिकांकडून दगडफेक करण्यात आली. भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाल्याने त्यांच्याकडून ही दगडफेक करण्यात आली. यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. या घटनेनंतर परिसरात पोलीसांची जादा कुमक मागविण्यात येउन सेना भाजप कार्यालयावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.

केंद्रिय मंत्री राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील आक्षेपार्ह विधानानंतर नाशिकसह संपूर्ण राज्यात याचे तीव्र पडसाद उमटले. नाशिकमध्ये राणेंविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसैनिकांनी भाजप कार्यालयावर चालून जात दगडफेक केली. ही घटना घडली तेव्हा भाजपचे स्विकृत नगरसेवक पवन भगुरकर हे कार्यालयात उपस्थित होते. घटनेची माहीती मिळताच भाजपच्या सर्व आमदार, महापौर, नगरसेवक भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात धाव घेतली. यानंतर संतप्त भाजप कार्यकर्ते शालीमार येथील शिवसेना कार्यालयाकडे चालून गेले. यावेळी शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजप कार्यकर्ते कालिदास कला मंदिर येथे पोहचताच पोलीसांनी जमावाला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यावेळी कार्यकर्ते हातात दगड घेत शिवसेना कार्यालयाकडे धावत सुटले. तिकडे शालीमार चौकात जमलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांना ही माहीती समजताच शिवसैनिकांनही कालिदास कला मंदिराकडून येणार्‍या जमावाच्या दिशेने धाव घेतली. जय भवानी जय शिवाजी, कोंंबडी चोर, कोंबडी चोर, नारायण राणे कोंबडी चोर अशी घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी जमावावर दगडफेक सुरू केली. यावेळी दोन्हीकडील जमावाला नियंत्रणात आणतांना पोलीसांची मात्र चांगलीच दमछाक झाली. शिवसैनिकांकडून होणार प्रतिकार पाहता भाजप कार्यकर्ते माघारी वळले. यानंतर भाजप शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आयुक्तालयाच्या दिशेने रवाना झाले.

- Advertisement -

फरांदे, पालवे फिरले माघारी

शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना कार्यालयाकडे कूच केले. अग्रभागी प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. मात्र भाजप कार्यकर्त्यांचा जमाव कालिदास कला मंदिरासमोर येताच समोरून प्रतिउत्तरादाखल शिवसैनिकांनी दगडफेक सुरू केली. समोरून होणारा विरोध पाहता आमदार फरांदे आणि पालवे तेथूनच माघारी वळले.

व्यावसायिकांची धावपळ

शिवसेना कार्यालयाच्या मागील बाजूस कालिदास कला मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर रेडीमेड कपडयांची दुकाने आहेत. सकाळी परिस्थिती सामान्य असल्याने या व्यावसायिकांनी दुकाने उघडली. मात्र भाजप, सेना कार्यकर्ते समोरासमोर भिडल्याने दोन्ही बाजूंकडून दगडांचा वर्षाव झाला. त्यामुळे घाबरलेल्या व्यावसायिकांची दुकाने बंद करण्यासाठी चांगलीच धावपळ उडाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -