घरमहाराष्ट्रसरकारला हेच सांगतोय, 'आम्ही तुमच्या सोबत आहोत' - उद्धव ठाकरे

सरकारला हेच सांगतोय, ‘आम्ही तुमच्या सोबत आहोत’ – उद्धव ठाकरे

Subscribe

‘२०१४ साली सरकार स्थापन झाल्यापासून सरकारला मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, की आम्ही तुमच्यासोबत आहोत. राज्यासमोरचे प्रश्न सोडवण्यासाठी, दुष्काळावर तोडगा काढण्यासाठी आमचा वापर करून घ्या. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही’, अशी उद्विग्न प्रतिक्रिया शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी बुधवारी बीडमध्ये दिली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बुधवारपासून मराठवाडा दौऱ्याला सुरुवात केली. त्याची सुरुवात बीडपासून झाली असून बीडमध्ये झालेल्या जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी मोदी सरकार आणि त्यांची कार्यपद्धती यावर आसूड ओढले. या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे मराठवाड्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

मला शेतीतलं काही कळत नाही

दरम्यान यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांना शेतीतलं काही कळत नाही अशी टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला. ‘मला शेतीतलं काही कळत नसेल, पण शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू दिसतात. केंद्रीय पथक राज्यात येऊन गेलं, पण त्यांनी काय केलं? ते काय बँजो पथक होतं का? गाजर द्यायची सुद्धा ऐपत असावी लागते. पण सध्याचं सरकार तर फक्त गाजर दाखवत आहे’, असं ते म्हणाले.

- Advertisement -

युतीची चर्चा गेली खड्ड्यात

‘मराठवाड्यातली ही या काळातली माझी पहिली भेट आहे. सरकारी यंत्रणेच्या सुस्त पडलेल्या अजगराला जागवण्यासाठी मी फिरतोय. युतीची चर्चा फक्त पेपरमध्ये सुरु आहे, पण आमच्यात नाही. युतीची चर्चा खड्ड्यात गेली, पण माझ्या शेतकऱ्यासाठी काहीतरी करा’, असं ते यावेळी बोलताना म्हणाले.

कर्जमाफीचं प्रमाणपत्र मिळूनही फायदा नाही

दरम्यान, कर्जमाफीचं प्रमाणपत्र मिळूनसुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नसल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. ‘महाराष्ट्राला १० हजार कोटी दिले अशी घोषणा केली. पण देणार कधी? तुमचे दिवस असे राहिलेत किती? इथल्या किती महिलांना उज्ज्वला योजनेत गॅस मिळालाय? किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला? शेतकऱ्यांना कर्जमाफीचं फक्त प्रमाणपत्र मिळालंय. पण त्यांना कर्जमाफी मात्र दिली जात नाही’, असं त्यांनी सांगितलं.

- Advertisement -

फक्त मोदींना वाटतंय देश बदलतोय

‘तुम्ही रोज नवनव्या देशात जातात. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल देश बदल रहा है. पण माझ्या देशातल्या लोकांची परिस्थिती बदलत नाहीये. हजारो कोटींच्या योजना असून सुद्धा परिस्थिती बदलत का नाही?’, असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.

पीकविमा योजनेत राफेलपेक्षा मोठा घोटाळा

दरम्यान, भाजप सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीकविमा योजनेवर यावेळी उद्धव ठाकरेंनी आसूड ओढले. ‘पीकविमा योजनेतसुद्धा हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. राफेलपेक्षा मोठा घोटाळा पीकविमा योजनेत झाला आहे. सौभाग्य योजनेतसुद्धा फायदा नसून दुर्भाग्यच वाट्याला आलं’, असं ते म्हणाले.

बांधायचं नव्हतं, तर राम मंदिराचं आश्वासन का?

यावेळी उद्धव ठाकरेंनी राम मंदिरासंदर्भातल्या भाजपच्या भूमिकेवर जोरदार आक्षेप घेतला. ‘आपल्याला सुद्धा राम मंदिर होईल असं वाटलं होतं. पण आता पंतप्रधानच म्हणतायत की न्यायालय निर्णय घेईल त्यानुसार होईल. मग जर न्यायालयच निर्णय घेणार होतं, तर मग तुमच्या जाहीरनाम्यात तुम्ही का मंदिर बांधण्याचं आश्वासन दिलंत? राम मंदिर बांधण्याचा देखील तुम्ही जुमला दिलात. अशा घोषणांचा आता पाऊस बंद करा. जितक्या घोषणा आत्तापर्यंत केल्या आहेत, त्यांची अंमलबजावणी नीट करा. केंद्राचं पथक बीडमध्ये येऊन गेल्यानंतर आधी मिळत असलेलं रेशनिंगचं धान्य सुद्धा कमी झालं’, असं ते म्हणाले.

आमचा सत्तेचा दुष्काळ हटवा

‘शिवसेना तुमच्या पाठिशी आहे. दुष्काळ गंभीर तरी शिवसेना खंबीर. त्यामुळे हा दुष्काळ हटवायचा असेल, तर शिवसेनेचा सत्तेचा दुष्काळ तुम्हाला हटवावा लागेल. त्यामुळे अच्छे दिन तरी नाही, पण सुखा-समाधानाचे दिवस तरी येतील’, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -