घरताज्या घडामोडीराठोडांच्या राजीनाम्याने फडणवीसांचा शड्डू ठरला पोकळ - शिवसेना

राठोडांच्या राजीनाम्याने फडणवीसांचा शड्डू ठरला पोकळ – शिवसेना

Subscribe

विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नामनियुक्ती मुद्द्यावरुन आणि संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरून आज शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी राजधर्माचे पालन केल्याने विरोधकांच्या तथाकथित वादळातील हवाच गेली. राज्यपाल, विरोधी पक्ष राजधर्म कधी पाळणार?, असा थेट सवाल सामनाच्या अग्रलेखातून राज्यपालांना करण्यात आला आहे. तसेच आता पूजा चव्हाणच्या मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही, असा शड्डू विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी ठोकला होता (वनमंत्री राठोड यांनी राजीनामाच दिल्याने हे शड्डू आता पोकळच ठरले आहेत), अशी खोचक टीका देवेंद्र फडवणीस यांच्यावर सामनातून करण्यात आली आहे.

१२ सदस्यांची यादी राजभवनात कुणाच्या खुर्चीत दडवून ठेवली आहे?

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजधर्माचे पालन करीत आहेत. अर्थात हा धर्म पाळण्याची जबाबदारी विरोधी पक्षाची देखील आहेच आणि भाजपने नेमलेल्या राज्यपाल महोदयांची तर जास्तच आहे. राज्यपालनियुक्त १२ सदस्यांची यादी राजभवनात कुणाच्या खुर्चीत दडवून ठेवली आहे? राज्यपालांनी ठाकरे सरकारशी जो उभा दावा मांडला आहे, १२ आमदारांच्या नियुक्त्या ज्या पद्धतीने लटकवून ठेवल्या आहेत, हे घटनेच्या विरुद्ध आहे. राजधर्माचे पालन न करण्याचे हे काम आहे. मुख्यमंत्र्यांनी राजधर्माचे पालन केल्याने विरोधकांच्या तथाकथित वादळातील हवाच गेली. राज्यपाल, विरोधी पक्ष राजधर्म कधी पाळणार?,’ असा सवाल केला आहे.

- Advertisement -

आता हे वादळ होणार म्हणजे नक्की काय होणार?

पुढे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी वगैरे ठरणार असल्याचे बोलले जात आहे. आता हे वादळ होणार म्हणजे नक्की काय होणार? नुसता गडगडाट होणार की मुसळधार असे काही घडणार? सध्याच्या काळात विधिमंडळात वादळ याचा अर्थ विरोधक सभागृहात गोंधळ घालणार, विधानसभा अध्यक्षांच्या समोर येऊन घोषणाबाजी करणार, सरकारविरोधात आरोळय़ा ठोकणार, असा होतो. हेच वादळ असेल तर अशा वादळांची सरकारला आता सवय झाली आहे.

पण मोहन डेलकरांच्या आत्महत्येबाबत भाजपच्या मंडळींना काहीच वाटत नाही

‘पूजा चव्हाणच्या मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही, असा शड्डू विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी ठोकला होता (वनमंत्री राठोड यांनी राजीनामाच दिल्याने हे शड्डू आता पोकळच ठरले आहेत). अर्थात या प्रकारची भाषा विरोधी पक्षनेत्यांच्या तोंडी शोभत नाही आणि त्यामुळे वादळ वगैरे निर्माण होण्याची सुतराम शक्यता नाही. पुण्यातील पूजा चव्हाण यांचे प्रकरण नक्कीच गूढ आणि चिंताजनक आहे. विरोधी पक्षाला तिच्या मृत्यूची चिंता वाटणे स्वाभाविक आहे, पण चिंता वाटणे आणि त्याचे भांडवल करणे यात फरक आहे. अशी चिंता मग राज्यातील प्रत्येक संशयास्पद मृत्यूप्रकरणी वाटायला हवी. दादरा-नगर हवेलीचे लोकप्रिय खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन गूढ पद्धतीने आत्महत्या केली. आपण का आत्महत्या करत आहोत? आपल्या आत्महत्येस जबाबदार कोण? हे सर्व त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवले. त्यात भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख लोकांचा उल्लेख आहे, पण मोहन डेलकरांच्या आत्महत्येबाबत भाजपच्या मंडळींना काहीच वाटत नाही, अशी विचारणा भाजपला शिवसेनेने केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राजीनामा दिला तो काय फ्रेम करून ठेवण्यासारखा नाही


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -