षण्मुखानंदमध्ये २६०० ची क्षमता, ५० टक्के शिवसैनिकांना परवानगी, कसा असणार दसरा मेळावा?

shivsena-dasara-melava

शिवसेनेचा दसरा मेळावा उद्या माटुंगा येथील षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे. ५० टक्के उपस्थितीतीसह हा दसरा मेळावा पार पडणार आहे. हजारो लाखोंच्या संख्येत शिवसैनिक आहेत. मग नेमकी कोणाला दसरा मेळाव्यात परवानगी मिळणार आहे, याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. याबाबत शिवसेना नेते अनिल देसाई यांनी माहिती दिली.

शिवसैनिकांसांठी दसरा मेळावा एक उर्जेचा स्रोत असतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंपासून ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपर्यंत दसरा मेळाव्याल्या शिवसैनिक हजारोंच्या संख्येनं गर्दी करतात आणि एक नविन उर्जा घेऊन पक्षाच्या कामाला सुरुवात करतात. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला एक वेगळीच परंपरा असून गेली अनेक वर्ष शिवाजी पार्कच्या मैदानात ठाकरेंची तोफ धडधडायची. पण यंदा हा सोहळा कोरोनामुळे षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. त्यामुळे हजारो शिवसैनिकांसमोर भाषण देणाऱ्या ठाकरेंना यंदा मोजक्याच लोकांसमोर भाषण करावं लागणार आहे. पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहचण्यासाठी ॲानलाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. या मेळाव्याला शिवसेनेचे नेते, मंत्री, आमदार विभागप्रमुख, महापौर आणि महापालिकेतले महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

शिवतीर्थावरील दसरा मेळावा कोरोनामुळं छोट्या सभागृहात घ्यावा लागत आहे. ष्णमुखानंदमध्ये २६०० ची क्षमता आहे. त्याच्या ५० टक्के शिवसैनिक उपस्थित राहतील. ठाण्यापर्यंतच्या शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साडेसात ते आठच्या सुमारास बोलतील. येत्या काळात महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. तसंच राजकीय घडामोडी होत आहेत यावर उद्धव ठाकरे बोलतील. तसंच राज्य सरकारने केलेल्या कामाचा आढावाही ते घेतील. महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली आहे. येत्या काळात राज्याची रूपरेखा कशी असेल त्यावर देखील उद्धव ठाकरे बोलणार आहेत.