घरमहाराष्ट्रदसरा मेळाव्यात भाजप लक्ष्य?

दसरा मेळाव्यात भाजप लक्ष्य?

Subscribe

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भाषणाची उत्सुकता, शिवसैनिकांमध्ये उत्साह

ऐतिहासिक समजला जाणारा शिवसेनेचा दसरा मेळावा आज, शुक्रवारी माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी ६ वाजता होत असून या मेळाव्यातून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विविध मुद्यांवरून भाजपला आणि केंद्रीय एजन्सीजना लक्ष्य करण्याची शक्यता आहे. ५० टक्के उपस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मेळाव्याला मार्गदर्शन करणार असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

मार्च २०२२ अखेरीस मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे महापालिकेसह १० महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणार्‍या या निवडणुका शिवसेनेसाठी महत्वाच्या आहेत. राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन झाल्यानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्याने आजच्या मेळाव्यात मुख्यमंत्री ठाकरे या निवडणुकीचे रणशिंग फुंकतील.

- Advertisement -

दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्कवर होतो. गेल्या वर्षी कोरोना संसर्गामुळे दसरा मेळावा दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडला होता. या मेळाव्याला उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले होते. यंदाचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात होणार असून शिवसेना नेते, उपनेते, खासदार, आमदार, संपर्कप्रमुख आणि नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. उत्तर प्रदेशातील लखिमपूर खिरी दुर्घटना, सेनेचे मंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या मागे लागलेला केंद्रीय चौकशी यंत्रणांचा ससेमिरा, भाजपच्या नेत्यांकडून आघाडीच्या नेत्यांवर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या कारभारावर सातत्याने होणार्‍या टीकेला उद्धव ठाकरे प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.

रामदास कदम, अनंत गीते यांच्या उपस्थितीविषयी प्रश्नचिन्ह
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करणारे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे संशयाच्या भोवर्‍यात सापडलेले माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या दसरा मेळाव्यातील उपस्थितीविषयी प्रश्नचिन्ह कायम आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -