shivsena dussehra Rally : शिवसेना दसरा मेळाव्याला रामदास कदमांना नो एंट्री, ऑडिओ क्लीपमुळे मुख्यमंत्री नाराज

shivsena dussehra Rally uddhav thackeray angry on ramdas kadam due to audio clip
shivsena dussehra Rally : शिवसेना दसरा मेळाव्याला रामदास कदमांना नो एंट्री, ऑडिओ क्लीपमुळे मुख्यमंत्री नाराज

शिवसेनेचा दसरा मेळावा मोठ्या संख्येनं शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये दादरमधील शिवतीर्थावर होत असतो. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी व्हर्च्युअल दसरा मेळावा घेण्यात आला होता. यंदा प्रत्यक्षात काही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये दसरा मेळावा होणार असून शिवसेना खासदार संजय राऊतांनी जागेची घोषणा केली आहे. या दसरा मेळावाव्याला शिवसेनेचे प्रमुख नेते, ज्येष्ठ नेते, आमदार, खासदार, महापौर उपस्थित असतील. यातच अशी माहिती समोर येत आहे की, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांना दसरा मेळाव्यात येण्याची परवानगी नसेल. एकंदरीत कथित ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे रामदास कदमांना या दसरा मेळाव्याला नो एंट्री असेल. अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा प्रत्यक्ष होणार असून मोजक्या आणि महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे. या दसरा मेळाव्याला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांना उपस्थित राहण्याची परवानगी नसेल अशी चर्चा आहे. तसेच सामन्य शिवसैनिकांनाही परवानगी नाकारण्यात आली आहे. केवळ ५० टक्के उपस्थितांमध्ये शिवसेना दसरा मेळावा होणार आहे.

रामदास कदमांवर मुख्यमंत्री नाराज?

शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याबद्दलची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांना दिली असल्याचा आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांच्याविरोधात करण्यात आला आहे. या प्रकरणात काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या असून यामध्ये रामदास कदम यांचा आवाज आहे. यामुळे रामदास कदम यांनीच माहिती दिली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या सर्व प्रकरणामुळे शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतप्त आहेत. तसेच रामदास कदम यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते आहे.

शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर?

शिवसेना ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्या आवाजाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. कथित ऑडिओ क्लिपमुळे शिवसेना पक्षाची बदनामी झाली असल्याचे मत काही शिवसैनिकांनी व्यक्त केलं आहे. रामदास कदम यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या काही दिवसांमध्ये कारवाई करतील परंतु काही शिवसैनिकांची मागणी रामदास कदम यांना शिवसेना दसरा मेळाव्याला न बोलवण्याची आहे. यामध्ये आणखी काही नेत्यांचीही नावे आहेत मात्र दसरा मेळाव्याला कोण उपस्थित राहणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा : college reopen : ऐकावं ते नवल, अजितदादांनी उघडलेले कॉलेज उदय सामंत करणार बंद?