राज्यघटना चुकीच्या लोकांच्या हाती, शिवसेनेचा रोख कोणावर?

मुंबई – एका महान उदात्त हेतूने बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना तयार केली. पण ती अंमलबजावणीसाठी चुकीच्या लोकांच्या हातात गेली तर नुकसान होईल, असाही डॉ. आंबेडकरांनी तेव्हा इशारा दिला होता. आज त्यांची आठवण येते, असं शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६६ वा महापरिनिर्वाण दिन आहे.

‘डॉ. आंबेडकर त्याच वेळी म्हणाले होते की, ‘या देशात दगडाला शेंदूर लावणे सोपे आहे, पण नंतर तो खरवडून काढणे कठीण आहे.’ आज अनेक शेंदूर फासलेल्या दगडांना देवत्व प्राप्त झाले. त्यांच्याकडे पाहून डॉ. आंबेडकरांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. ‘सत्यमेव जयते’ हे ब्रीदवाक्य राष्ट्राने आपल्या डोक्यावर धारण केले आहे. पण आज सत्य औषधापुरते नव्हे, तर औषधालाही मिळत नाही. नफेखोरांचेच राज्य चालले आहे व जनतेच्या प्रश्नांशी त्यांना काहीच देणे-घेणे नाही. म्हणून डॉ. आंबेडकरांची आठवण जनतेला रोजच येत आहे. डॉ. आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार होते,’ असं या अग्रलेखात म्हटलं आहे.

हेही वाचा – आता आदित्य ठाकरेंची छत्रपती शिवरायांशी तुलना, राहुल कनालच्या ट्विटमुळे संताप

‘पंतप्रधान मोदी काशीला गेले. त्यांनी गंगेत डुबकी मारली व किनाऱ्यावरील तंबूत पाच दलितांचे पाय धुतले. अशाने काय जातीयता नष्ट होणार आहे? डॉ. आंबेडकरांची आठवण अशा वेळी येथे येतच राहील. डॉ. आंबेडकरांनी 1933 सालीच सांगून टाकले होते की, मी हिंदू धर्माचा त्याग करीन हे नक्की आणि इस्लामचा स्वीकार करणार नाही हेदेखील नक्की! पाकिस्तानने अनेक प्रलोभने दाखवूनही त्यांनी इस्लामचा स्वीकार केला नाही. हे त्यांचे राष्ट्रावर व हिंदू धर्मावर उपकार आहेत. त्यांनी इस्लामचा स्वीकार केला नाही, कारण इस्लाम धर्मात परिवर्तनशीलता नाही. त्यात कुराणाचा शब्द अखेरचा आहे. ज्यात अक्षराने बदल करता येत नाही. डॉ. आंबेडकरांना हे मान्य नव्हते,’ असंही यात म्हटलं आहे.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली. न्याय, स्वातंत्र्य, लोकशाही, नागरिकांचा हक्क यांचा पुरस्कार केला. आज त्या घटनेची पदोपदी पायमल्ली होत आहे. न्यायालये, वृत्तपत्रे, निवडणूक आयोग, संसद असे सर्व घटनात्मक स्तंभ कोलमडून पडले आहेत. अनेक प्रकरणांत कायदे स्वस्थ बसत आहेत. देशात काय घडत आहे हे जाणून घेण्याचा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. लोकशाहीतला तो पहिला धडा असतो; परंतु आजच्या सरकारने लोकशाहीच्या या प्राथमिक मूल्यावरच प्रहार केला आहे. देशाच्या एकसंधतेला तडे जातील असे हे धोरण आहे. अशा वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण प्रकर्षाने होतेय,’ असं अग्रलेखात म्हटलं आहे.