HomeमहामुंबईठाणेEknath Shinde : रंग बदलणाऱ्या सरड्याची ही नवीन जात...ठाकरे-फडणवीस भेटीवर काय म्हणाले...

Eknath Shinde : रंग बदलणाऱ्या सरड्याची ही नवीन जात…ठाकरे-फडणवीस भेटीवर काय म्हणाले शिंदे

Subscribe

महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून सातत्याने घटनाबाह्य सरकार, घटनाबाह्य मुख्यमंत्री, विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हणून त्यांची संभावना करणारे इतक्या लवकर रंग बदलतील असं वाटलं नव्हतं, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ठाण्यात दिली.

ठाणे : महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून सातत्याने घटनाबाह्य सरकार, घटनाबाह्य मुख्यमंत्री, विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हणून त्यांची संभावना करणारे इतक्या लवकर रंग बदलतील असं वाटलं नव्हतं, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ठाण्यात दिली. (shivsena eknath shinde reaction on aditya thackeray and cm devendra fadnavis meeting)

छत्रपती संभाजीनगर येथील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ठाकरे गटाचे आमदार, युवा नेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्याबाबत शिंदे यांना विचारण्यात आले.

हेही वाचा – Delhi Election 2025 : जमत नसेल तर मोडून टाका इंडि आघाडी…आप-कॉंग्रेसमध्ये खटके, अब्दुल्ला भडकले

महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर टोकाची राजकीय टिपण्णी करणाऱ्या ठाकरे-फडणवीसांची भेट अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झान्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांची भेट घेतली तर नाही, पण उलट गद्दार आणि घटनाबाह्य सरकार म्हणत टीकाच केली होती. मात्र, त्याच ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीसांचं अभिनंदन केलं. त्यावरही अनेकांच्या भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आमदार आदित्य ठाकरेंनी तीन वेळा फडणवीसांची भेट घेतली आहे. आजही त्यांनी वरळी मतदारसंघातील विषयांसह विविध मुदद्यांवर चर्चा केली. या भेटीसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारले असता, त्यांनी ठाकरेंच्या वक्तव्याची आठवण करुन दिली.

घटनाबाह्य सरकार, घटनाबाह्य मुख्यमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फडतूस म्हणणारे, एक तर तू तरी राहशील नाही तर मी तरी राहील अशी टोकाची भाषा बोलणारे एवढ्या लवकर रंग बदलतील असं वाटलं नव्हतं, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी ठाकरे-फडणवीस भेटीवर प्रतिक्रिया दिली. सरडा रंग बदलतोच पण अशा प्रकारची नवीन जात मी पहिल्यांदाच बघितल्याचे त्यांनी सांगितले. बाळासाहेबांच्या, हिंदुत्वाच्या विचारांची प्रतारणा केली, त्यांना जनतेने जागा दाखवून दिली. मतदारांनी त्यांचा कचरा केला. तुम लढो, हम कपडा सांभालते है, तसं तुम लढो हम बुके देके आते है.. असं मागे मी म्हटलं होतं, त्याची आठवण शिंदे यांनी यावेळी करून दिली.

या विधानसभा निवडणुकीने आणि महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीला संस्कृती, संस्कार शिकवले आहेत. यापूर्वी ते शिव्या, शापाशिवाय काहीही बोलत नव्हते. पहिलं सरकार स्थापन झाल्यापासून शिव्या, शाप आणि आरोप त्याशिवाय दुसरं त्यांनी काहीच केलेलं नाही. पण, आम्ही त्यांच्या आरोपांना आरोपांनी कधीच उत्तर दिलं नाही, तर आम्ही कामातून उत्तर दिल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा – IPL 2025 : हे पाच खेळाडू रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला बनवू शकतात चॅम्पियन

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोनवेळा भेट घेतली होती. नागपूर हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे फडणवीसांना भेटले होते. त्यानंतर, आता तिसऱ्यांदा त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन विविध विषयावर संवाद साधला. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या गृहनिर्माण खात्यासंदर्भातील प्रश्नही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडेच मांडले.