ठोकून काढा, हात नाही तोडता आला तर तंगडी तोडा..,बंडखोर आमदाराच्या वक्तव्याविरोधात शिवसेनेची तक्रार

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार प्रकाश सुर्वे यांच्या चिथावणीखोर भाषणामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मागोठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी काल दहिसर कोकणीपाडा बुद्धव विहार येथील कार्यक्रमात चिथावणीखोर भाषण केले होते. प्रकाश सुर्वे यांनी भाषणातून ठोकून काढा, कापून काढा, हात नाही तोडता आला तर तंगडी, तोडा, दुसऱ्या दिवशी मी टेबल जमीन करून देतो, अशी प्रक्षोभक वक्तव्ये केली होती.

प्रकाश सुर्वे यांच्या चिथावणीखोर भाषणावर आक्षेप घेत शिवसेनेचे माजी नगरसेवक उदेश पाटेकर यांनी दहिसर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे. कायदा, सुव्यवस्था, लोकशाही संविधान यांचे धिंडवडे करणाऱ्या या आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं पोलिसांकडे केली आहे.

माजी नगरसेवक उदेश पाटेकर यांनी त्या कार्यक्रमाची फेसबूक लाईव्ह लिंक देखील शेअर केली आहे. प्रकाश सुर्वे त्या भाषणात ठोकून काढा, कापून काढा, हात नाही तोडता आला तर तंगडी, तोडा, दुसऱ्या दिवशी मी टेबल जमीन करून देतो, अशी चिथावणीखोर वक्तव्य करताना दिसत आहेत. यासंदर्भात व्हिडीओ रेकॉर्डिंग सुद्धा पोलिसांना देण्यात आलं आहे.

सुषमा अंधारेंची प्रकाश सुर्वेंवर टीका

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रकाश सुर्वे यांच्या वक्तव्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल उपस्थित केला आहे. या व्हिडिओमध्ये बोलणारी व्यक्ती आमदार प्रकाश सुर्वे जाहीरपणे हातपाय तोडण्याची, कापून काढण्याची कोथळा बाहेर काढण्याची भाषा करत आहेत. गृहमंत्रालय स्थापित झाले असेल तर अशा गावगुंडांचे सदस्यत्व अजुन का अबाधित आहे हे सांगावे, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.


हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या कामांची अब्दुल सत्तारांनी केली तुलना, म्हणाले…