भाजप प्रभारींच्या पार्ट टाईम मुख्यमंत्री वक्तव्यावर शिवसेनेचे प्रत्युत्तर

shivsena hit back on bjp statement uddhav thackeray part time cm
भाजप प्रभारींच्या पार्ट टाईम मुख्यमंत्री वक्तव्यावर शिवसेनेचे प्रत्युत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पार्ट टाईम मुख्यमंत्री आहेत. फुलटाइम नसल्याचे वक्तव्य भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी.टी.रवी यांनी केले. महाराष्ट्र भाजप कार्यकारिणीमध्ये भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. तसेच उद्धव ठाकरेंना जनता मुख्यमंत्री मानत नाही असे वक्तव्य विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. प्रभारी सी टी रवी यांना शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम काम केलं आणि त्याचे कौतुक केंद्र सरकारनेही केलं असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आलेल्या टीकांवर शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिंदे म्हणाले की, कोरोना परिस्थितीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती हाताळण्याच्या उपाययोजनांमुळे केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयानेही कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः कौतुक केलं आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासुन विरोधकांकडून आरोप करण्यात येत आहेत. परंतु विरोधकांच्या आरोपांवर दुर्लक्ष करुन सरकार काम करत आहे.

राज्य सरकार भाजपच्या आरोपांकडे दुर्लक्ष करुन समोर आलेल्या संकटांचा सामना करत आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही मदत करण्यात येत आहे. राज्यातील विकासकामे थांबली नाहीत. शेतकऱ्यांना १०-१० हजार कोटी रुपयांची मदत दिली आहे.

भाजपचा महाविकास आघाडीवर निशाणा

भाजप प्रदेश कार्यकारिणीमध्ये विरोधी पक्षातील नेत्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला होता. भाजपचे प्रभारी सी.टी.रवी यांनी उद्धव ठाकरे यांना पार्ट टाईम मुख्यमंत्री म्हटलं आहे. उद्धव ठाकरे फुल टाईम मुख्यमंत्री नाहीत तर पार्ट टाईम आहेत. राजकारणातील गुन्हेगारी यांच्या हातचा मळ झाला असल्याची टीका सी.टी रवी यांनी केली होती. तर जनतेला उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री वाटतच नाहीत असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.


हेही वाचा : स्वातंत्र्य भीक असे संबोधणाऱ्यांना बाळासाहेबांनी पाच फूट जमिनीत गाडले असते, राऊतांचा घणाघात