आमदारांनंतर पहिल्या खासदाराचे बंड, उद्धव ठाकरेंच्या सेनेला धक्का

आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेच्या पहिल्या खासदाराने बंड पुकारला आहे. कोल्हापूरचे खासदार प्रा. संजय मंडलिकच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.

Sanjay Mandlik

आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेच्या पहिल्या खासदाराने बंड पुकारला आहे. कोल्हापूरचे खासदार प्रा. संजय मंडलिकच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. खासदार मंडलिक यांनी शिवसेना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जावे असा आग्रह त्यांच्या कार्यकर्त्यांनी धरला होता. अखेर कार्यकर्त्यांच्या आग्रहाची दखल घेत मंडलिकांनी शिंदे गटात सहभाग घेतला आहे. (Shivsena Kolhapur Mp Sanjay Mandlik Join to Eknath Shinde Rebel Group)

गेल्या चार पाच दिवसात त्यांची भूमिका बदलत गेली. मुंबईतील मातोश्रीवर झालेल्या बैठकीस आणि कोल्हापुरातील पक्षाच्या मेळाव्यास त्यांनी दांडी मारली. त्यामुळे त्यांच्याबाबत संशयाचे वारे फिरू लागले होते. अखेर मंडलिकांनी शिंदे गटात सहभाग घेतल्याचे समजते. दरम्यान, कोल्हापूरचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात “केवळ निष्ठा आणि भावनिकेतेवर राजकारण करता येत नाही, सत्तेबरोबर राहून विकास करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे खासदार मंडलिक यांनी शिवसेना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जावे”, असे म्हटले होते.

शिवसेनेचे दुसरे खासदार धैर्यशील मानेही बंड करणार असल्याने जिल्ह्यात शिवसेनेला मोठे फटका बसण्याची शक्यता आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात कोल्हापूर जिल्ह्यातील सेनेचे माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील, आमदार प्रकाश आबिटकर आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर हे तीन नेते सहभागी झाले. यामध्ये खासदार मंडलिकही सहभागी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी कागल तालुक्यातील हमीदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यांचे सुपुत्र विरेंद्र मंडलिक यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत ठरल्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी शिंदे गटात जाण्याचा आग्रह धरला होता.

केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने उर्वरित काळात मोठा निधी आणून जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मंडलिकांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याचे बोलले जात आहे.

मंडलिकांसोबत दुसरे खासदार धैर्यशील माने हेदेखील शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते. त्यांनीही कोल्हापुरातील पक्षाच्या बैठकीस दांडी मारली होती. ते सध्या दिल्लीत आहेत. त्यामुळे आता आमदारांनंतर खासदारही बंड करत असल्याने येत्या काळात शिवसेनेला मोठा फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा – राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी द्रौपदी मुर्मूंनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्याची चर्चा