‘रडायचं नाही लढायचं’, संजय राऊत यांचे विरोधी पक्षांना पत्र

गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv sena mp sanjay raut) यांना ईडीने अटक केली आहे. संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी (ED Custody) सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आज कोठडीतून संजय राऊत यानी विरोधी पक्षांना पत्र लिहिले आहे.

गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv sena mp sanjay raut) यांना ईडीने अटक केली आहे. संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी (ED Custody) सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आज कोठडीतून संजय राऊत यानी विरोधी पक्षांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी “बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला ‘रडायचं नाही लढायचं’ अशी शिकवण दिली होती. त्याच मार्गाने जात आहे”, असे लिहीले आहे. (shivsena leader mp sanjay raut wrote thanking letter to other party leaders for support after ed arrest)

संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचा काँग्रेस (Congress) व इतर विरोधी पक्षांनी निषेध केला होता. त्यामुळे संजय राऊत यांनी त्यांचे आभार मानण्यासाठी पत्र लिहिले आहे. तसेच, राऊत यांनी आपण या दडपशाहीविरोधात संघर्ष करणार असल्याचा निर्धार या पत्रात व्यक्त केला.

मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिलेले पत्र समोर

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे राज्यसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह इतर पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहिले आहे. त्यांच्यापैकी मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिलेले पत्र समोर आले आहे. या पत्रात लिहिल्यानुसार, “माझ्यावर झालेल्या ईडीच्या कारवाई विरोधात मला कृती आणि विचारातून पाठिंबा दिला. संसदेत आणि संसदेबाहेर माझ्या सहकारी खासदारांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर आपण सर्वांनी पाठिंबा दिला आहे. त्यासाठी मी आभार मानत आहे”, असे संजय राऊत यांनी पत्रात लिहिले आहे.

याशिवाय, “मी वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार वागत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला ‘रडायचं नाही लढायचं’ अशी शिकवण दिली होती. त्याच मार्गाने जात आहे”, असेही राऊत यांनी पत्रात लिहिले आहे.

राजकीय सूडबुद्धीतून तपास यंत्रणांद्वारे कारवाई

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाई केल्यानंतर, आपल्याविरोधात राजकीय सूडबुद्धीतून तपास यंत्रणांद्वारे कारवाई केली जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. दरम्यान, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच माझे कुटुंबीय, हितचिंतक यांच्या पाठिंब्यावर या कठीण काळातून लवकरच बाहेर पडू, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे 8 ऑगस्टनंतर संजय राऊत यांना दिलासा मिळणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संजय राऊतांवरील आरोप

  • शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याशी थेट संबंध असल्याचा आरोप ईडीने केला आहे.
  • HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले.
  • अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली.
  • संजय राऊत यांच्या परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे.
  • या प्रकरणात ज्यांचे नाव सुरुवातीला समोर आले होते आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती ते प्रविण राऊत हे नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत आहे.

हेही वाचा – मविआच्या स्थापनेनंतरही युतीची चर्चा सुरू होती, पण राणेंमुळे मोडता; केसरकरांचा गौप्यस्फोट