घरमहाराष्ट्रमाजी मंत्री शिवतारे ICUमध्ये, संपत्तीसाठी भावांकडून वडिलांचा मानसिक छळ; मुलीच्या आरोपांनी खळबळ

माजी मंत्री शिवतारे ICUमध्ये, संपत्तीसाठी भावांकडून वडिलांचा मानसिक छळ; मुलीच्या आरोपांनी खळबळ

Subscribe

शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांना आज पहाटे हृदयविकाराचा झटका आला. शिवतारे हे सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ते सध्या आयसीयूमध्ये आहेत, अशी माहिती विजय शितारे यांच्या कन्या ममता लांडे-शिवतारे यांनी दिली. त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी विजय शिवतारे यांच्या मुलांवर म्हणजेच स्वत:च्या भावांवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे आता खळबळ उडाली आहे. या पोस्टमुळे विजय शिवतारे यांच्या कुटुंबातील कलह समोर आला आहे.

“माझ्या पित्याची माझ्याच भावांनी संपत्तीच्या लोभापायी केलेली दयनीय अवस्था पाहून आज मी अत्यंत अस्वस्थ आहे” असा आरोप विजय शिवतारे यांची कन्या आणि आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या पत्नी ममता शिवतारे लांडे यांनी वडिलांच्या फेसबुक अकाऊण्टवरुन केला आहे.

- Advertisement -

ममता शिवतारे लांडे यांनी काय लिहिलंय पोस्टमध्ये?

आज दिनांक २२/०६/२०२१ वेळ पहाटे ३:००, ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या आयसीयू (ICU) विभागात बसून हे लिहिण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं.

मी ममता शिवदीप लांडे-शिवतारे, आजवर आपण बापूंच्या राजकीय कारकीर्दीत क्वचितच मला पाहिले असेल. मग आज मी बोलत आहे तर नक्कीच त्यामागे एक मोठ्ठ कारण आहे.

- Advertisement -

बापूंसारखे वडील मला मिळाले हे माझे भाग्य. मला त्यांनी फुलासारखं जपलं. माझी प्रत्येक जबाबदारी अतिशय खंबीरपणे पार पाडली. मला अपार प्रेम दिलं. माझ्या आयुष्यात त्यांना देवापेक्षाही वरचं स्थान आहे. अशा माझ्या पित्याची माझ्याच भावांनी संपत्तीच्या लोभापायी केलेली दयनीय अवस्था पाहून आज मी अत्यंत अस्वस्थ आहे.

मागील काही दिवसात फेसबुक वरून होत असलेल्या पोस्टने आपल्या मनात संभ्रम निर्माण केला आहे. माझा भाऊ विनय विजय शिवतारे काही कौटुंबिक वादातून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी ही कित्येक वर्ष असाच त्रास बाबांनी सहन केला. मात्र कधीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही, कारण त्यामुळे माझे भाऊ व त्यांच्या कुटुंबाला हानी पोहोचेल अस त्यांना वाटत होतं व आजही वाटतं.

मागील वर्षी जानेवारी २०२० मध्ये अत्यंत गंभीर प्रकृती असताना त्यांचे बायपास झाले हे आपणा सर्वांना माहीतच आहे. डॉक्टरांनी त्यांच्या वाचण्याची शक्यता २० टक्के आहे असे सांगितले. माझा भक्कम असा आधारस्तंभ ढासळतो की काय या भीतीने माझी झोपच उडाली होती. ऑपरेशन यशस्वी झालं, मात्र त्यानंतरही जीवाला धोका असताना माझा मोठा भाऊ सतत धमक्या देऊन मानसिक त्रास देत होता. मागील दीड वर्षापासून किडनीच्या आजारामुळे बाबा एक दिवसाआड डायलीसीसला जातात. या दीड वर्षात एकदाही माझ्या दोन्ही भावांपैकी कोणीही त्यांना भेटायला सुद्धा आले नाही. ते आहेत की नाही? याची सुद्धा विचारपूस केली नाही. त्यांची प्रकृती नाजूक असल्याने मानसिक दबाव अजून वाढवून, त्यांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सूरु झाले. आजवर आयुष्यभर कमावलेली सगळी संपत्ती विनय व विनस व त्यांच्या कुटुंबाच्या नावे बाबांनी केली. तरीही जेजुरीतील इथेनॉल प्लांट नावावर करून देण्यासाठी वारंवार त्यांच्याकडून दबाव टाकण्यात येत आहे. या सर्व गोष्टीत मी कायम फक्त बघ्याची भूमिका बजावत होती. मी स्वतः डॉक्टर असल्याने त्यांच्या प्रकृतीची गांभीर्याने दखल घेत मी जानेवारी २०२१ मध्ये हॉस्पिटलचा राजीनामा दिला व पूर्ण वेळ बाबांसोबत राहून त्यांच्या कामाचा ताण कमी करण्याचा व आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कदाचित त्यांना बळ मिळाले आणि विनयच्या धमक्यांकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. मात्र मागील दोन महिन्यांपासून तो दबाव सोशल मीडियाद्वारे बदनामी करून सतत वाढवला जात आहे. सर्व संपत्ती नावावर करूनही मानसिक त्रास कमी होत नव्हता. तो आताही अशाच बदनामीच्या धमक्या देत आहेत.

आपण माझ्या बाबांवर अफाट प्रेम केलत. तेच त्यांच्यासाठी सर्वस्व आहे. ते प्रेम कधीही कमी पडू देऊ नका. बाबाही अविरत पुरंदर साठी आपला जीव ओततील .

आज सर्व काही सहनशीलतेच्या पलीकडे गेलं आहे आणि त्याच धक्क्याने त्यांना पहाटे हृदयविकाराचा झटका आला. आय सी यु मध्ये रात्री २:०० वाजता मी त्यांना घेऊन आली, ऍडमिट केले.
माझी देवाला प्रार्थना आहे, मला बळ दे!!!

काही प्रश्न आहेत, त्यावर नक्की आपणही सर्वांनी विचार करावा.

१)१९९४ साली घडलेल्या घटना सत्य असोत वा असत्य, आज २७ वर्षानंतर त्या का आठवाव्यात?
२) बाबांचा इतका द्वेष वाटत असेल तर त्यांचा राजकीय व आर्थिक व्यवहार विनय शिवतारेने २०१८ पर्यंत का सांभाळला?
३) बाबांनी कमावलेली संपत्ती आजवर दोघांनी निमूटपणे नावे का करून घेतली?
४)विनय शिवतारे व विनस शिवतारे यांनी स्वकर्त्वृत्वावर आजवर काय कमावलं?
५) वाद सर्व घरात असतात, म्हणतात ना घरोघरी मातीच्या चुली… पण मृत्युशय्येवर असलेल्या वडीलांसोबत असा व्यवहार कीतीही वाईट असले तरी कोणी मुलगा करणे योग्य आहे का?

प्रिय बांधवांनो, माता भगिनींनो,

आज दिनांक २२/०६/२०२१ वेळ पहाटे ३:००, ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या आय सी यू (ICU)…

Posted by Vijay Shivtare on Monday, 21 June 2021

शिवतारेंच्या पत्नीने आरोप फेटाळले

विजय शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी शिवतारे यांनी मुलगा विनय शिवतारे यांच्या फेसबुक अकाऊण्टवरुन लाईव्ह येत लेकीचे आरोप फेटाळले. मुलगी ममता यांनी मुलगा विनय आणि विनस यांच्यावर केलेले आरोप धादांत खोटे आहेत. वास्तविक गेल्या २७ वर्षांपासून माझे पती विजय शिवतारे कुटुंबापासून अलिप्त राहत होते. त्यातील पहिली पाच वर्ष उज्ज्वला बागवे नावाच्या महिलेसोबत लग्न करुन राहत होते. त्यानंतर आजतागायत मीनाक्षी पटेल यांच्यासोबत पवईस राहत आहेत. संपत्ती हा वादाचा विषय नाही, विजय शिवतारेंच्या मानसिक जाचातून सुटका करुन घेणे, हा माझा आणि माझ्या कुटुंबाचा एकमेव हेतू आहे, असा दावा मंदाकिनी शिवतारे यांनी केला आहे.

कोण आहेत विजय शिवतारे?

विजय शिवतारे हे शिवेसेनेचे दिग्गज नेते आहेत. विजय शिवतारे हे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले. युतीच्या सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. मात्र, २०१९ च्या निवडणुकीला त्यांचा पराभव झाला.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -