घरमहाराष्ट्र'राजदंड पळविणे म्हणजे शिवसेनेची स्टंटबाजी'

‘राजदंड पळविणे म्हणजे शिवसेनेची स्टंटबाजी’

Subscribe

हिंम्मत असेल तर राजीनामा द्या आणि सत्तेतून बाहेर पडा, स्टंटबाजी काय करता? अशा शब्दात विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली. नाणार मुद्यावरून शिवसेना आमदारांनी नागपुरातील पावसाळी अधिवेशनात अध्यक्षांचा राजदंड पळवला. त्यावरून विखे -पाटील यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे.

नागपूरमध्ये सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये बुधवारी नाणारचा मुद्दा चांगलाच गाजला. यावेळी शिवेना आमदार राजन साळवी, प्रताप सरनाईक आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी राजदंड पळवला. राजदंड पळवण्यावरून नितेश राणे आणि शिवसेना आमदारांमध्ये एकप्रकारची चढाओढ सुरू होती. राजदंड पळविणे म्हणजे शिवसेनेची स्टंटबाजी असल्याची टीका विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे – पाटील यांनी केली. शिवाय नाणारप्रश्नी शिवसेनेची भूमिका प्रामाणिक असेल तर त्यांनी आजच्या आज सत्तेतून बाहेर पडावे असे आव्हान देखील यावेळी राधाकृष्ण विखे – पाटील यांनी शिवसेनेला केले आहे. राजदंड पळवण्याच्या मुद्यावरून राधाकृष्ण विखे – पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार टिका केली आहे.

‘स्टंटबाज शिवसेना’

विधानसभा अध्यक्षांचा राजदंड पळवणे हा केवळ शिवसेनेचा स्टंट आहे. मंगळवारी जेव्हा नाणारप्रश्नावर जेव्हा चर्चा सुरू होती. त्यावेळी शिवसेना मुग गिळून गप्प का होती? मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील असे सांगून उद्योगमंत्री सुभाष देसाई देखील गप्प होते. शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेसाठी वर्तमानपत्रांनी शिवसेनेला झोडपून काढले त्यानंतर शिवसेनेला जाग आल्याची टिका देखील विखे – पाटील यांनी केली. शिवाय, डॅमेज कंट्रोलसाठी शिवसेनेला राजदंड पळवण्याची नौटंकी करावी लागली अशा शब्दात विखे – पाटील शिवसेनेवर टिकास्त्र डागले. खासदार विनायक राऊत यांनी नाणार प्रकल्पाविरोधात मोर्चा काढला होता. त्या मोर्चात सेनेने ‘आंब्याच्या फांदीवर बसलाय मोर, भाजप सरकार जमीन चोर’, ‘एक दो एक दो, भाजप सरकार फेक दो’ अशा घोषणा दिल्या होत्या. जर हिम्मत असेल तर या घोषणा शिवसेनेने सभागृहात द्याव्यात असे आव्हान देखील विखे – पाटील यांनी सेनेला दिले. रस्त्यावर एक आणि विधीमंडळात वेगळी भूमिका मांडून शिवसेना कोकणवासियांची निव्वळ फसवणूक करत असल्याची घणाघाती टीका देखील राधाकृष्ण विखे – पाटील यांनी शिवसेनेवर केली.

- Advertisement -

नाणारला कोकणात तीव्र विरोध

नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पाला कोकणवासियांचा तीव्र विरोध आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये नाणार होऊ देणार नाही अशी भूमिका कोकणवासियांनी घेतली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाने देखील नाणारला जोरदार विरोध दर्शवला आहे. मात्र केंद्र सरकार नाणार प्रश्नी सौदीतील कंपन्यांशी करार करत असल्याने आगामी काळात नाणार प्रश्न पेटणार हे नक्की!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -