मी मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही, तुम्हाला आज वचन देतो – आमदार राहुल पाटील

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात आहे. जवळपास ३९ आमदारांचा शिंदे गटात समावेश झाला आहे. दिवसागणिक शिंदे गटात आमदार वाढत आहेत. त्यामुळे कोणता आमदार कधी शिंदे गटात जाईल याचा भरवसा राहिलेला नाहीये. दरम्यान, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बंडखोरी केल्यानंतर प्रत्येक आमदारावर आता संशय व्यक्त केला जात आहे.

परभणीचे शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांचा मागील दोन दिवसांपासून फोन लागत नव्हता. त्यामुळे ते नॉट रिचेबल असल्याच्या वावडया उठवल्या जात होत्या. मात्र, याबाबत त्यांनी स्वत: व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच यासंदर्भातील गोष्टीचा खुलासा केला आहे.

मी मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही, तुम्हाला वचन देतो

माझ्याबाबत अफवा पसरवण्याचे काम सुरू आहे. मी माझ्या मतदारसंघातील परभणीतील दैनंदिन कामकाज संपवून मंत्रालयात उभा आहे. मंत्रालयातूनच बाहेर निघत आहे. मी कुठेही जाणार नाही. कालही, आजही आणि उद्याही नाही. अशा प्रकारच्या बातम्यांवर परभणीतील माझ्या विधानसभेतील सर्व मतदारांनी विश्वास ठेवू नये. कुणीही अस्वस्थ होण्याचं कारण नाही. मी मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही, याबाबत मी तुम्हाला आज वचन देतो, असं आमदार राहुल पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उदय सामंत यांच्या बंडानंतर शिंदे गटात सहभागी होणारे ते आठवे मंत्री आहेत. आतापर्यंत महाविकास आघाडी सरकारमधील एकनाथ शिंदे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, बच्चू कडू, शंभूराज देसाई यांच्यानंतर उदय सामंत हे आठवे मंत्री आहेत. सामंत यांच्या जाण्याने शिवसेनेला जबर धक्का बसला आहे.


हेही वाचा : आमच्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरेच : दीपक केसरकर