घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरमविआ सरकारमध्ये पैसे घेऊन बदल्या? चंद्रकांत खैरेंच्या मुलाच्या कथित 'ऑडिओ बॉम्ब'ने खळबळ

मविआ सरकारमध्ये पैसे घेऊन बदल्या? चंद्रकांत खैरेंच्या मुलाच्या कथित ‘ऑडिओ बॉम्ब’ने खळबळ

Subscribe

खैरे यांच्या चिरंजीवाच्या या व्हायरल ऑडिओमुळे चंद्रकांत खैरेंसोबत महाविकास आघाडी सुद्धा अडचणीत येणार असल्याचं चिन्ह दिसत आहे.

महसूल विभाग आणि वन विभागाने लॉकडाऊन काळात केलेल्या मुदतपूर्व बदल्या बऱ्याच गाजल्या. ‘पोस्टिंग’ राजकारणाबाबत राज्यभर आश्चर्य व्यक्त करण्यात आले. वन खात्याच्या बदलीसाठी एका व्यक्तीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा मुलगा ऋषिकेश यांनी पैसे घेतल्याचं एका कथित ऑडिओ क्लिपमधून समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे, ऋषिकेश यांनी स्वतः या ऑडिओ क्लिपमध्ये पैसे घेतल्याचं मान्य केलंय. त्यामुळे राजकीय क्षेत्रात चंद्रकांत खैरेंच्या मुलाच्या ‘ऑडिओ बॉम्ब’ने खळबळ माजली आहे. दरम्यान, माय महानगर या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीत.

चंद्रकांत खैरे यांचा मुलगा ऋषिकेश खैरे यांची कथित ऑडिओ क्लिप सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागली आहे. चंद्रकांत खैरे यांचा मुलगा ऋषीकेश हे युवासेनेचा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आहेत. व्हायरल होत असलेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये समोरची व्यक्ती महाविकास आघाडी सरकार काळात बदलीसाठी ऋषीकेश यांना दिलेले दोन लाख रुपये परत मागताना दिसून येतोय. बदलीचं काम झालं नाही म्हणून मला माझे पैसे परत करा, असा तगादा हा व्यक्ती लावताना दिसतोय. त्यावर ऋषिकेश खैरे पैसे देण्यासाठी टाळाटाळ करताना दिसून येत आहे.

- Advertisement -

“मी घरातील सोनं-चांदी विकून दोन लाख रुपये दिले होते, तुम्ही कामही केले नाही आणि पैसेही देत नाहीत, त्यामुळे मी खूप अडचणीत आहे. तुम्ही मला हलक्यात घेत आहात, आता एकच तारीख सांगा आणि माझे पैसे परत द्या”, अशी मागणी व्यक्ती करत आहे. यावर ऋषीकेश खैरे त्या व्यक्तीला डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुला शंभर टक्के पैसे देऊन टाकतो, असं आश्वासन देतात.

ऋषिकेश खैरेंची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता चंद्रकांत खैरे सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यावर ऋषिकेश खैरेंनी एका खासगी वृत्तवाहिनीला आपली प्रतिक्रिया दिली आहे. ऋषिकेश खैरे म्हणाले की, “कोरोना सुरू होण्याआधी माझा एक मित्र त्याच्या पत्नीच्या बदलीसाठी आला होता. त्यावेळी ठाकरे सरकार असल्यानं बदली करून देऊ असं मी सांगितलं होतं. पण अचानक कोरोना आला आणि त्यानंतर राज्यात राजकीय घडामोडी घडल्याने बदलीचे काम होऊ शकले नाही. पण त्याचे जे काही पैसे असतील ते मी परत करायला तयार आहे”, असं देखील ऋषिकेश खैरे म्हणाले. बदलीसाठी पैसे घेतल्याचं स्वतः ऋषिकेश खैरेंनी मान्य केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात बदलीसाठी पैसे घेतल्याचं चित्र स्पष्ट होताना दिसत आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडीच्या काळात पैसे देऊन बदल्या केल्या जात होत्या का? हा सवाल ऋषिकेश खैरेंना केला असता यावर त्यांनी भाष्य केले नाही. खैरे यांच्या चिरंजीवाच्या या व्हायरल ऑडिओमुळे चंद्रकांत खैरेंसोबत महाविकास आघाडी सुद्धा अडचणीत येणार असल्याचं चिन्ह दिसत आहे.

ऑडिओ क्लिपमधील संपूर्ण संभाषण…

ऋषी खैरे: हॅलो
विजय: बोला भाऊ

ऋषी खैरे: कुठे आहे तू…
विजय: इकडे शेंद्राला होतो
ऋषी खैरे: आ…
विजय: शेंद्राला
ऋषी खैरे: अच्छा, काळेचा फोन आला होता, काय झाले
विजय: अरे हो ना, तुम्ही दोघेपण ह्ल्क्यातच घेऊ लागले, एवढी परेशानी चालू आहे माझी, दोन अडीच वर्षे झाले पैसे देऊन, दोन लाख रुपये.. काय बोलणार आहे बरं तुम्हाला, विशाल देखील काही रिस्पॉन्स देत नाही.. तुम्ही रिस्पॉन्स देऊ नाही राहिले
ऋषी खैरे: आज काय तारीख आहे, 23 तारीख आहे…पहिल्या आठवड्यात देऊन टाकतो
विजय: आता लय वेळीस सांगितले न तुम्ही, किती वेळेस भेटलो. तेथून आता इथे आलो होतो.
ऋषी खैरे: हंड्रेड पर्सेंट होईल
विजय: तुम्हाला माहीत आहे का भाऊ, मी घरातील सोने-चांदी देखील मोडले आहे, आता एवढी परेशानी चालू आहे. तुम्ही लोकांनी फोन उचलले नाही, काय करायचं बरं सांगा तुम्ही.. माझं काम देखील नाही झाले बदलीचे, नंतर दीड-दोन वर्षे देखील वाया गेले माझे
ऋषी खैरे: डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुझं काम करून देतो किंवा पैसे देतो
विजय: नै काम करूच नका, काम करून घेतो मी, आता लोकांना परत पैसे देऊन बसलो आहे मी, तिकडे बदलीसाठी
ऋषी खैरे: अच्छा दिलेले आहे का?
विजय: हो…
ऋषी खैरे: पैसे देऊन टाकतो
विजय: तुम्ही तारीख सांगा भाऊ एक फिक्स, खरंच लय परेशानी चालू आहे माझी
ऋषी खैरे: डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात देऊन टाकतो
विजय: लास्ट तारीख आठ पकडू का मी…
ऋषी खैरे: होय…
विजय: बरं ठीक आहे चालेल… (फोन कट होतो)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -