घरताज्या घडामोडीऔरंगाबाद उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ; भाजपचे उमेदवार पराभूत!

औरंगाबाद उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ; भाजपचे उमेदवार पराभूत!

Subscribe

औरंगाबाद उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर महाविकासआघाडीचे उमेदवार राजेंद्र जंजाळ यांची निवड झाली आहे.

राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर स्थानिक निवडणुकांमध्ये देखील हाच फॉर्म्युला वापरायचं अंतिम झाल्यानंतर औरंगाबाद महानगर पालिकेमध्ये अजब चित्र निर्माण झालं होतं. गेल्या २७ वर्षांपासून आमने-सामने असलेले शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आता एकाच बाजूला होते आणि एका बाजूला असणारे शिवसेना-भाजप आता आमने आले. त्यातच राज्यात महाविकासआघाडी झाल्यानंतर भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे अवघ्या ४ महिन्यांवर महानगर पालिका निवडणुका आल्या असूनही पुन्हा उपमहापौर पदाची निवडणूक घ्यावी लागली. यामध्ये अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या उमेदवाराला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला. मात्र, आश्चर्य म्हणजे एमआयएमच्या २ नगरसेवकांनी देखील शिवसेनेच्याच उमेदवाराला मतदान केलं. त्यामुळे शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांनी भाजप पुरस्कृत गोकुळ मलके यांचा ५१ विरुद्ध ३४ मतांनी पराभव केला. त्यामुळे आता पुढचे ४ महिन्या औरंगाबादमध्ये महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांवर शिवसेनेचेच नगरसेवक असणार आहेत.

एमआयएमचे नगरसेवकही शिवसेनेच्या पाठिशी!

या निवडणुकीत शिवसेनेने राजेंद्र जंजाळ यांना उमेदवारी दिली होती. तर त्यांच्याविरोधात भाजप पुरस्कृत उमेदवार गोकुळ मलके निवडणूक लढवत होते. एमआयएमकडून जफर बिल्डर यांना उमेदवारी देण्यात आली होती. जंजाळ यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मिळून ५१ मतं मिळाली, तर मलकेंना ३४ आणि जफर यांना १३ मतं मिळाली. विशेष म्हणजे एमआयएमच्या २ नगरसेवकांनी शिवसेनेचे जंजाळ यांना मत दिलं, तर एका नगरसेवकाने भाजप पुरस्कृत उमेदवार गोकुळ मलके यांना मत दिलं. एमआयएमची मतं फुटल्यामुळे पक्षाचे खासदार वारिस पठाण यांनी पक्षाच्या उमेदवाराला मतं न देणाऱ्या ३ नगरसेवकांची हकालपट्टी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -