घरमहाराष्ट्रआरोग्यमंत्री दीपक सावंत यांना दे धक्का

आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना दे धक्का

Subscribe

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुबंई एकचे विभागप्रमुख विलास पोतनीस यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नाराज झालेल्या डॉ. सावंत यांनी सोमवारी रात्री मंत्रीपदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षा बंगल्यावर जाऊन दिला. मुख्यमंत्र्यांचे मुंबई येथील निवासस्थान वर्षा बंगल्यावर राजीनामा दिल्यानंतर १० मिनिटांतच डॉ. सावंत तेथून निघून गेले.

डॉ. सावंत यांच्याऐवजी पोतनीस

राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्री असलेले डॉ. सावंत तीनवेळा मुंबई पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आले आहेत. शिवसेनेने विधान परिषदेतील सुभाष देसाई, दिवाकर रावते आणि डॉ. सावंत अशा तीन आमदारांना मंत्रिपदे दिल्याने विधानसभेतील ज्येष्ठ आमदारांनी गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजीचा सूर आळवला होता. परिषदेतील मंत्री काम करीत नसल्याचाही त्यांनी आक्षेप नोंदवला होता. आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका पाहता शिवसेना नेतृत्वालाही काही बदल करायचे होते. त्यात डॉ. सावंत यांच्या आमदारकीची टर्मही संपत होती. गेल्या तीन महिन्यांपूर्वीच डॉ. सावंत यांनी, ‘आपल्याऐवजी इतरांना उमेदवारी द्यायची असेल तर द्यावी’, अशी इच्छा व्यक्त केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर डॉ. सावंत यांच्याऐवजी पोतनीस यांना उमेदवारी देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतलाय. विभागप्रमुख असलेले विलास पोतनीस हे लोकाधिकार समितीचे गेली अनेक वर्षे ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून काम पाहत आहेत. डॉ. सावंत यांच्यापाठोपाठ आणखी दोन ज्येष्ठ मंत्र्यांनाही मंत्रिपदावरून दूर करीत पक्षसंघटनेची जबाबदारी देण्याबाबत पक्षात गांभीर्याने विचार सुरू असल्याचे कळते.

- Advertisement -

डॉ. सावंत यांची मंत्रीमंडळ बैठकीला हजेरी

दरम्यान, डॉ. दीपक सावंत यांचा राजीनामा उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला नसल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही राजीनामा पाठवला होता. मात्र आज (५ जून) मंत्रीमंडळ बैठकीला डॉ. सावंत हजर असल्याची माहिती मिळत आहे. काल मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपुर्द केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सावंत यांना सबुरीचा सल्ला देत मंत्रीमंडळ बैठकीला हजर राहण्यास सांगितले होते.

कोण आहेत डॉ. दीपक सावंत

दीपक सावंत हे व्यवसायाने डॉक्टर आहेत त्याच्या मुलाचे अनिदीप नावाचे हॉस्पिटल देखील आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून ते विधान परिषदेवर जाण्याअगोदर जव्हार, मोखाडा याभागात कुपोषणा विरोधात त्यांनी काम केलेले आहे. याच कामाच्या माध्यमातून ते एका फोनवर मातोश्रीवर उपलब्ध होणारे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

- Advertisement -

दीपक सावंत यांना उमेदवारी का नाकारली

डॉ. सावंत यांच्या मंत्रीपदाच्या कार्यपद्धतीवर शिवसेना आणि युवासेनेच्या नेत्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्याकडे जाहीर रित्या नाराजी व्यक्त केली होती. सामान्य कार्यकर्त्यांची कोणतीही कामे करत नसल्याबद्दल पक्षात असंतोष पसरला होता. फोनवर संपर्क साधला असता ते उपलब्ध होत नसल्याच्याही अनेक तक्रारी शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्या होत्या. पक्षसंघटनेच्या वाढीसाठी वेळ देत नसल्याचाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -