प्रताप सरनाईकांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांची युवासेनेतून हकालपट्टी

शिंदे गटाचे बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेत आतापर्यंत अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे. जे आमदार, खासदार, नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यांना पदावरून हटवण्यात आलं आहे. पूर्वेश सरनाईक यांच्यासह सहसचिव किरण साळीचीही शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी पूर्वेश सरनाईक यांनी ठाण्यातील सर्व युवकांना घेऊन शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवसेनेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. युवासेना सचिव असलेल्या पदावरून पूर्वेश सरनाईक यांच्यावर कारवाई करत त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार पूर्वेश सरनाईक आणि किरण साळी यांनाही पदावरून काढून टाकण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी शिंदे गटाने शिवसेनेला मोठा धक्का दिला होता. वरुण सरदेसाईंची युवासेना राज्य सचिवपदावरुन शिंदे गटाने हकालपट्टी करण्यात आली होती. वरूण सरदेसाई यांची हकालपट्टी केल्यानंतर शिंदे गटाकडून किरण साळी यांची युवासेनेच्या राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानण्यात येत होता. मात्र, आता पूर्वेश सरनाईक यांच्यापाठोपाठ किरण साळींचीही शिवसेनेकडून हकालपट्टी करण्यात आली असून शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : वरुण सरदेसाईंची युवासेना राज्य सचिवपदावरुन हकालपट्टी, शिवसेनेला धक्का