शिवसेना – शिंदे गटातील टीझर वॉरनंतर आता शिंदे गटाकडून नवं गाणं रिलीज

मुंबई : शिवसेनेचे नेते स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘शिवसेना स्फूर्तीगीत’ हे शिवसेनेचे नवे गाणे आज लाँच केले. काल उद्भव ठाकरे यांनी आनंद शिंदे यांना घेऊन शिवसेनेचे गाणे तयार करण्याची चर्चा सुरू असतानाच आज थेट गाणे लाँच करून दोन गटात सुरू असलेल्या टीझर बॉरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आघाडी घेतली आहे.

‘आम्ही शिवबाचे धारकरी.. शिवसेनेचे मानकरी’ अशा ओळी असलेले हे गाणे गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेनुसार ‘प्रभारंग फिल्म्स्’ यांनी तयार केले असून आदर्श शिंदे यांनी ते गायले आहे. निमति संदीप माने, कार्यकारी निर्मात्या उर्मिला हिरवे, गीतकार संतोष सातपुते, संगीतकार पार्थ उमराणी, एडिटर सत्यजित पाटील, शरद डहाळे या टीम ने अत्यंत कमी वेळेत हे गीत तयार करण्याचे आव्हान पूर्ण केले. आज स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वतीने पत्रकार परिषदेत ते लाँच करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे नेते तसेच ‘प्रभारंग फिल्म्स’ चे संचालक संदिप माने, संचालक उर्मिला हिरवे, शरद डहाळे आदी उपस्थित होते.

या वेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “हे गीत म्हणजे आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या महान जीवनकार्याला निष्ठावंत शिवसैनिकानं अंतःकरणातून दिलेली मानवंदना आहे. इतकंच नव्हे तर बाळासाहेबांचा शिवधर्माचा, हिंदुत्वाचा वारसा पुढे नेण्याचं वचन आहे.

ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी या मराठी मुलखात स्वराज्याचं बीज पेरलं, त्याच ध्यासानं बाळासाहेबांनी मराठी मनांत स्वाभिमानाची ज्वाला पेटविली. शिवकाळापासून अखंड चालत आलेल्या स्वराज्य पालखीची धुरा घेऊन साहेबांनी सुवर्ण इतिहास लिहिला. या पालखीला आपल्या खांद्यावर घेऊन शिवसेनेचा प्रवास सुरू झाला. अन् संकटांच्या वादळातही शिवनीती टिकविण्याचं आव्हान बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकांनी पेललं. शिवसेनेचा हाच धगधगता प्रवास है। या स्फूर्तीगीताचं प्रेरणास्थान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही शिवसैनिक बाळासाहेबांचा हा वारसा समर्थपणे पुढे नेत आहोत. उद्या बीकेसी येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे स्फूर्तीगीत लाँच करत आहोत. आम्ही शिवसेनेचे मानकरी असं अभिमानानं म्हणताना प्रत्येक शिवसैनिकाच्या डोळ्यात आनंद असेल… अन् शिवसेनेचा भगवा झेंडा मिरवण्यासाठी त्याला आणखी बळ मिळेल!

प्रभारंग फिल्म्स् चे संचालक संदिप माने म्हणाले, “शिवसेनेचे नेते मा. गुलाबराव पाटील यांनी या गीताची संकल्पना मांडली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे शिवरायांनी दाखवलेल्या स्वराज्य मार्गावरून करोडो माणसांना सोबत घेऊन निघाले. भगवा ध्वज खांद्यावर घेऊन.. हे गीत तयार करताना हेच सूत्र प्रभारंग फिल्म्स’च्या टीमच्या ध्यानीमनी होते.. गीतकार संतोष सातपुते यांनी हे गाणं लिहिलं असून संगीत पार्थ उमराणी यांनी दिले आहे. गायक आदर्श शिंदे यांनी आपल्या दमदार आवाजाने या गाण्यात अनोखा जोश निर्माण केला आहे. प्रत्येक शिवसैनिकाला आपलंसं वाटणारं, तना-मनात चैतन्य फुलवणारं हे स्फूर्तीगीत आहे. यातील ‘शिवसेनेचे मानकरी’ ही उपमा प्रत्येक शिवसैनिकाला सुखावणारी आहे. या गीतातून आदरणीय साहेबांचा अनुकरणीय प्रवास नि कोटी कोटी शिवसैनिकांच्या मनी असलेले त्यांच्या साहेबांबद्दलचे प्रेम, आदर नि निष्ठा अधोरेखित होते.


लातूरमध्ये कार व एसटी धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू