सत्ता गेल्यानंतर शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न; पदाधिकारी, नगरसेवकांकडून घेतले जाणार निष्ठेचं प्रतिज्ञापत्र

कोणत्याही पक्षाला मान्यतेसाठी आणि निवडणुक चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे कार्यवाही करणे गरजेचे असते. यात शिंदे गटाकडून 39 आमदारांच्या पाठींब्यावर निवडणूक आयोगाकडे शिवसेना पक्षांवर आणि शिवसेनेच्या चिन्हावर दावा केली जाण्याची शक्यता आहे

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 39 आमदारांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारसोबतची शिवसेनेची सत्ता तर गेलीच मात्र शिवसेना पक्षालाही मोठं भगदाड पडलं आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. यात एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांसह भाजपसोबत मिळून महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. इतकेच नाही तर आता शिंदे गटाकडून मूळ शिवसेनाच आमची असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे शिवसेना नेतृत्त्वाकडून कडक पाऊले उचलली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेते पदावरून हटवले. तसेच आता शिवसेनेच्या सर्व नगरसेवक, आमदार, खासदार आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना पाठींबा असल्याचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पदाधिकाऱ्यांकडून निष्ठेचे प्रतिज्ञापत्र घेऊन पक्षावर आपली कमांड असल्याच दाखवण्याचा हा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे.

आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर माझा विश्वास असून त्यांनी माझा बिनशर्त पाठींबा आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रति मी पूर्ण निष्ठा व्यक्त करीत आहे. अशा मजकूराचं हे प्रतिज्ञापत्रात असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रतिज्ञापत्राखाली स्वत:ची सही आणि कंसात शिवसेनेतील पद याचा उल्लेख करण्यास सांगण्यात आल्याची देखील माहिती आहे.

कोणत्याही पक्षाला मान्यतेसाठी आणि निवडणुक चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे कार्यवाही करणे गरजेचे असते. यात शिंदे गटाकडून 39 आमदारांच्या पाठींब्यावर निवडणूक आयोगाकडे शिवसेना पक्षांवर आणि शिवसेनेच्या चिन्हावर दावा केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षातील बहुसंख्य पदाधिकारी आपल्याच पाठीशी असल्याचे दाखवण्यासाठी शिवसेना पक्षश्रेष्ठींकडून प्रतिज्ञापत्र घेतले जात आहे, त्यामुळे निवडणुक आयोगाकडे आपली बाजू भक्कपणे मांडता येईल तसेच शिवसेनेवर कुणीही दावा सांगणार नाही. अशी माहिती सुत्रांकडून समोर येत आहे.


जनतेचा विश्वास पुन्हा जिंकणार; राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा दावा