मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा 85 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक दिग्गज नेत्यांनी नवी दिल्लीत त्यांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी राजकीय मतभेद बाजूला ठेवून वाढदिवसाचे निमित्त साधत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील पवारांची भेट घेतली आहे. अशातच कर्जत जामखेडचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी शरद पवारांच्या सत्तेतील सहभागाबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. पत्रकार परिषदेत सुनंदा पवार यांना अजित पवार आणि शरद पवार यांच्या दिल्लीतील भेटीबाबत प्रश्न विचारण्यत आला. यावर त्या म्हणाल्या की, शरद पवार आणि अजित पवारांच्या कुटुंबियांची भेट ही राजकीय नव्हती तर कौटुंबिक होती. परंतु मला वाटते की, दोन्ही राष्ट्रवादीने आता एकत्र येण्याची गरज आहे. यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी वक्तव्य केले आहे. (shivsena thackeray group leaders reaction on sharad pawar ajit pawar meeting.)
हेही वाचा : Mumbai Goa Highway : रामाचा वनवास 14 वर्षांचा, कोकणवासीयांचा वनवास किती वर्षांचा
गुरुवारी पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी शरद पवारांना भेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. या भेटीची राजकीय वर्तुळात आता चांगलीच चर्चा रंगली आहे. तसेच या विषयावर सुनंदा पवार यांनी देखील मोठे वक्तव्य केले आहे. काल शरद पवारांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त त्यांना भेटण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. यात काही गैर नाही, असे सुनंदा पवार म्हणाल्या आहेत. तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित याव्यात अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तेच मलाही वाटते. राजकारणात कार्यकर्ता महत्वाचा असतो, त्यामुळे विखुरलेले राहण्यापेक्षा एकत्रित यावे असे मला वाटते. तसेच त्या म्हणाल्या, अजित पवार मला जेव्हा भेटतील तेव्हा मी त्यांना शुभेच्छा नक्की देईल. मात्र सुनंदा पवारांच्या या वक्तव्यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. कुटुंब म्हणून एकत्र येणं स्वाभाविक आहे. सुनंदा पवार नेमक्या कोणत्या संदर्भानं म्हटल्या? कुटुंब म्हणून एकत्र यायला हवं की राजकारणात एकत्र यायला हवं? असेही अंधारे म्हणाल्या आहेत.
हेही वाचा : Vijay Wadettivar : राऊतांचे विधान नैराश्यातून…; असे का म्हणाले विजय वडेट्टीवार?
पुढे त्या म्हणाल्या, राजकारण म्हणून एकत्रित यायला हव असेल तर अजित पवारांच्या संगतीत जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे लोक आहेत ते मारकडवाडीमध्ये जाऊन पवारांबद्दल कमालीचे अपशब्द वापरतात त्याबद्दल अजित पवार यांची काय भूमिका आहे? लोकसभा निवडणुकीच्या वेळी महिला आयोगावर असणाऱ्या बाई टीका करत असताना अत्यंत बिकट हास्य करत होत्या, हे सगळे चीड आणणारे आहे. या लोकांबद्दल भूमिका काय आहे? त्या जर राजकारणात एकत्र आले पाहिजे असे म्हणत असतील तर त्याचा महाविकास आघाडीवर परिणाम होतो, त्यामुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता होणे फार स्वाभाविक आहे, असे देखील सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
Edited By Komal Pawar Govalkar